सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या कारभारावर खुद्द त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांचाच असंतोष वाढला असून आरोग्य विभाग कृती समितीने दिलेल्या निवेदनानुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना याबाबत पत्र दिले आहे.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन आरोग्य विभागातील कारभाराचा पाढा वाचला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सन 2020 पासून पदोन्नती दिलेली नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यास टाळाटाळ केली जात आहे. काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले, आता विधानसभा तोंडावर असतानाही या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी टाळाटाळ केली आहे. याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण व इतर प्रश्नांवर बैठक घेऊन मार्ग काढलेला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या दहा प्रश्नांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची सूचना केली आहे.

नुकत्याच झालेल्या डीपीसीच्या बैठकीत माजी आरोग्य मंत्री विजयकुमार देशमुख यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली होती. नव्याने झालेल्या जिल्हा रुग्णालयात अपुऱ्या सोयी असल्याबाबत त्यांनी लक्ष वेधले होते. तसेच सोलापूरविषयी तळमळ असणारे चांगले अधिकारी द्या, अशी मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या प्रश्नाबाबत भाजपचे आमदार गंभीर नसल्याचे दिसून आल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी खासदारांकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे.

सीईओनी घेतली दखल…

अशाच पद्धतीने प्राथमिक शिक्षण विभागातील प्रश्नांबाबत अनेकांनी लक्ष वेधले आहे. या दोन्ही बाबींची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आरोग्य व शिक्षण विभागाची गुरुवारी तात्काळ आढावा बैठक बोलावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *