सोलापूर : मंद्रूपच्या संत सेवालाल निधी बँकेतील ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले मंद्रूप झेडपी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव गुरुजींचा घोटाळा दोन कोटीवर पोहोचला आहे. दरम्यान जाधव गुरुजीला तिसऱ्यांदा दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
याप्रकरणी ठेवीदार योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जाधव गुरुजी व त्याच्या मुलास अटक केली आहे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता आधी दोन दिवस व नंतर तीन आणि आता पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. जाधव गुरुजींना अटक केल्यानंतर फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी तक्रार देण्यासाठी सदर बझार पोलिसांकडे धाव घेतली आहे. यामध्ये मंद्रूप व वडकबाळ परिसरातील ठेवीदार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. घोटाळ्याचा आकडा आता एक कोटी 99 लाखापर्यंत गेला आहे.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक लकडे, हवालदार राहुल आवारे यांच्या पथकाने जाधव गुरुजीच्या मंद्रूप येथील घर, वांगी रस्त्यावरील शेत, सैफुल येथील घराची झाडाझडती घेतली आहे. जाधव गुरुजीने बँकेच्या व्यवहारासंदर्भात अद्याप महत्त्वाची कागदपत्रे दिलेली नाहीत. तोंडीच हिशोब ते सांगत आहेत. पोलिसांनी सीएचा रिपोर्ट घेतला आहे. त्यामुळे या बँकेची नेमकी उलाढाल किती हे अद्याप समजलेले नाही. ठेवीदार अजून तक्रार देण्यासाठी येतच आहेत. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. बँकेच्या व्यवहारातून जाधव गुरुजींनी काय काय संपत्ती जमा केली याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.