सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजाची मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली आहे. जाणीवपूर्वक चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माफी नाही, असा इशारा त्यांनी बैठकीत देत आरोग्य कर्मचारी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी संघटनेच्या कृती समितीने शुक्रवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत पाठपुरावा करूनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रश्न निकाली न काढल्यामुळे कृती समितीने खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास शुक्रवार दि. 9 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. खासदार शिंदे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना पत्राद्वारे लक्ष वेधले होते.
या घडामोडीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, प्रशासनाधिकारी नागेश पाटील उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न मांडले. निवृत्त झालेले व सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या फायली स्वतः सीईओनी तपासल्या. प्रशासन विभागाने यात बऱ्याच त्रुटी काढलेल्या दिसून आल्या. सीईओ आव्हाळे यांनी जागेवरच चार फायली मंजूर केल्या व उर्वरित फायलींचा लवकरच निपटारा केला जाईल, असे आश्वासन दिले. फायली कोणाकडे किती दिवस प्रलंबित होत्या याचा सविस्तर अहवाल तयार करण्याची त्यांनी सूचना दिली. यात जाणीवपूर्वक चुका करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला . आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार पाच तारखेलाच होईल यासाठी सर्व तालुक्यातून नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी सर्व तालुक्यांच्या आरोग्य केंद्रातील लिपिकांची तातडीची बैठक शुक्रवारी प्रशिक्षण केंद्रात बोलावली आहे. या बैठकीला प्रशासन विभागाचे अधिकारी हजर राहणार आहेत. सीईओ आव्हाळे यांनी प्रश्न मार्गी लावल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे कृती समितीने पत्रक काढले आहे.