सोलापूर : दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथील सेवालाल निधी बँकेच्या घोटाळाप्रकरणी मंद्रूप झेडपी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी जाधव यांची अखेर जेलमध्ये रवानगी झाली आहे.
सेवालाल निधी बँक घोटाळ्याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी शिवाजी जाधव यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना व त्यांच्या मुलाला अटक केली होती. न्यायालयाने या घोटाळ्याच्या तपासासाठी दोघांना चार वेळा पोलीस कोठडी सुनावली. जाधव गुरुजींचा घोटाळा दोन कोटीपर्यंत पोहोचला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने जाधव गुरुजी व त्याच्या मुलाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या दोघांची आता जेलमध्ये रवानगी झाली आहे.
गेल्या सहा महिन्यापासून हे प्रकरण सुरू होते. तक्रारदार ठेवीदारांना जाधव गुरुजींनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. यातील दोन महिला ठेवीदारांना कॅन्सरची बाधा झाली होती, असे सांगण्यात आले. उपचारासाठी त्यांना पैसे हवे होते. पण गुरुजींनी त्यांना पैसे परत करण्याचे फक्त आश्वासन दिले. गुरुजीकडे शेती, घर, गाड्या असताना त्या विकून या दोघी गरजू ठेवीदार महिलांना त्यांच्या ठेवीचे पैसे परत करणे शक्य होते. गुरुजींनी त्यांना पैसे दिले नाहीत. त्यात ठेवीदारांनी उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून गुरुजीकडे अनेक हेलपाटे मारले. पण गुरुजीला त्यांची दया आली नाही. कॅन्सरमुळे त्या दोन महिला ठेवीदारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर त्या ठेवीदारांच्या नातेवाईकांनी गुरुजींना आमचा तळतळाट लागेल, अशी शापवाणी केल्याची मंद्रूप परिसरात चर्चा आहे. ठेवीदारांना पैसे देतो म्हणणारे गुरुजी अखेर जेलमध्ये गेले. त्यामुळे जाधव गुरुजींना या ठेवीदारांचा तळतळाट लागला, अशी आता चर्चा सुरू झाली आहे. जाधव गुरुजींनी सेवालाल निधी बँक व समर्थ फायनान्सच्या माध्यमातून अनेकांकडून ठेवी घेतल्या. मंद्रूप, माळकवठे, वडकबाळ या परिसरातील अनेकांनी ज्यादा व्याज मिळण्याच्या आशेने घरातील सोने-नाणे मोडून, शेती विकून, निवृत्तीनंतर आलेली रक्कम, उसनवारी करून रक्कम गुंतवली. यातून गुरुजींनी आपली जिंदगी आरामात घालवली. पण पोलिसांचा मानकुटीवर हात पडल्यानंतर मात्र गुरुजींना पश्चाताप झाला आहे. पैशाच्या लोभात मी कसा अडकत गेलो कळले नाही. आता मला गुरुजी म्हणून घ्यायलाही लाज वाटते, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.