सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या. जिल्हा परिषदेकडे 50 टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या योजनेतून कृषी साहित्यासाठी पंचायत समितीकडे तुम्ही अर्ज केला आहे काय? 20 ऑगस्ट रोजी अर्ज केलेले शेतकऱ्यांमधून लॉटरी पद्धतीने या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सेस फंडातून 50% अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या योजनेतून देण्यात येणाऱ्या कृषी साहित्यासाठी पंचायत समित्यांकडे अर्ज मागविले होते. 11 पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारामध्ये स्प्रे पंप, थ्री पिस्टन पंप, बॅटरी ऑपरेटेड पंप, ब्रश कटर, इंसेक्ट ट्रॅप, ट्रॅक्टर चलीत अवजारे : पलटी नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र, कल्टीवेटर, सिंचनासाठी पाच एचपी इलेक्ट्रिक पंप, डिझेल इंजिन, जनावरे संगोपनासाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, शेती सुपीक करण्यासाठी स्लरी फिल्टर अवजारांसाठी पाच ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले होते. 2451 लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. 15886 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जातून लॉटरी पद्धतीने झेडपीच्या सभागृहात 20 ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांची सोडत काढण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या उपस्थिती ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पंचायत समितीच्या कार्यालयातील कृषी विभागात पहावयास मिळणार असल्याचे कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी कळविले आहे.