सोलापूर : गतवर्षी आवर्षणामुळे खरीप पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली पण लोकसभा निवडणुकीपासून केवायसीचे निमित्त करून अद्यापपर्यंत भरपाई खात्यावर न टाकल्याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
गतवर्षी खरीप पेरणी झाल्यानंतर पुरेसा पाऊस पडलाच नाही. जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला तर इतर तालुक्यातील पीकनिहाय सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली. शेतकऱ्यांना मंजूर झालेली भरपाईची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तलाठ्यांना पाठवण्यात आली. भरपाईच्या पैशाच्या आकडेवारीकडे पाहून शेतकऱ्यांना निदान यंदाच्या खरीप पेरणीला तरी सरकार आपल्या मदतीला धावून आले अशी आशा वाटली. दरम्यान लोकसभा निवडणूक आली. त्यामुळे नुकसान भरपाई लटकली. त्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करून घेण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सूचना देण्यात आल्या. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन सेंटरवर रांगा लावून केवायसी करून घेतली. केवायसीला दोन महिने उलटले तरी नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर पडण्याचे नावच नाही. सध्या खरिपाची काढणी तोंडावर आहे. अशात पाऊस थांबायचे नाव घेत नाही. उजनी धरण क्षेत्रात पाऊस पडतच असल्याने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे भिमेला दुसऱ्यांदा पूर आला आहे. पुन्हा शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. खरिपाची काढणी करून रब्बीच्या पेरणीची तयारी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. यासाठी पुन्हा बियाणे व खताची गरज भासणार आहे. या सर्व मेहनतीतीच्या कामाला मजुरांचा रोजगार देण्यासाठी, खते व बियाणे खरेदीसाठी सरकारने नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर टाकली तर शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने पाठवली जात आहेत. पण अजून सरकारला जाग आली नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.