सोलापूर : दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी येथील सोसायटी संचलित रेशन दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
आहेरवाडीतील विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचलित रास्त भाव धान्य दुकान क्र. ८ या दुकानाचे चालक प्रभाकर दिंडोरे यांनी शिधापत्रिका धारकांना अपुरा अन्नधान्य दिला असल्याची तक्रार विश्वनाथ बिराजदार यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे झालेल्या तपासणीत दुकानात शासनाने ठरवून दिलेले अनेक नियम व अटींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.तपासणी पथकाच्या अहवालानुसार, दुकानात गहू आणि तांदूळ यांची शिल्लक अपेक्षेपेक्षा जास्त आढळून आली. तसेच, 16 वर्षांपासून लेखा परीक्षणाचा अहवाल सादर केला नाही आणि 8 वर्षांपासून परवाना नूतनीकरण केलेला नाही, शिल्लक फलक न लावणे आदी गंभीर बाबीही समोर आल्या. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, दुकानातील शिल्लक धान्याची तफावत रक्कम वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.