मुरूमचे सुपुत्र डॉ.आनंद मुदकण्णा यांनी सोलापुरात रेल्वे लाईन परिसरात सुरुवातीला आपली सेवा सुरू केली. मेंदूच्या अनेक विकारांमध्ये त्यांनी रुग्णांना जीवदान दिले. अपघातात जखमी झालेल्या अनेक रुग्णांच्या मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. डोकेदुखी चक्कर येणे अशा मेंदूशी संबंधित अनेक जुनाट रोगावर त्यांनी इलाज केला. परफेक्ट निदान व उपचार करण्यात त्यांची अल्पावधीतच ख्याती झाली. त्यामुळे सोलापूर बरोबरच कर्नाटकातून अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत होते. जुन्या ठिकाणी जागा कमी पडू लागल्यावर त्यांनी पुणे रोड परिसरात स्पर्श नावाचे मोठे हॉस्पिटल बांधले. रुग्णांची सेवा सुरू असतानाच त्यांना मुखाचे कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांनी परदेशातील निष्णांत डॉक्टरांकडे उपचार घेतले. कॅन्सरमधून ते बाहेर पडले असे सांगण्यात येत होते. पुन्हा त्यांनी पथ्य न पाळल्यामुळे कॅन्सरची बाधा वाढत गेली. काही दिवसापूर्वी ते आजारी पडले. या आजारात त्यांचे निधन झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. एका तरुण डॉक्टरांच्या आकस्मित निधनामुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.
यातून काय बोध घ्याल…
व्यसन मग कोणतेही असो त्याचे दुष्परिणाम सर्वांना सारखेच आहेत. तुम्ही आजारी पडला की डॉक्टरांकडे गेल्यावर पहिल्यांदा डॉक्टर तुम्हाला गुटका, पान तंबाखू खाता का? दारू पिता का? अन्य कोणते व्यसन आहे का? असे विचारतात. व्यसन करू नका? ते आरोग्याला अपायकारक असतात असा सल्ला देताना अनेक डॉक्टर दिसतात. सोलापुरातील डॉक्टरांच्या व्यसनाविषयी माढे गुरुजींना आलेले अनुभव त्यांनी सांगितले आहेत. मुलाचा अपघात झाल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जावे लागले. दुखण्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांना मद्य प्राशनाचे व्यसन होते. असे हे डॉक्टर थेट दुखऱ्या जागेवर इंजेक्शन करण्यात पटाईत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. सर्जरी करणाऱ्या एका निष्णात डॉक्टराला तंबाखूचे व्यसन तर एक फिजिशियन सिगारेट पिताना दिसले. व्यसन करू नका असे सांगणारे डॉक्टरच व्यसन करताना दिसून आले. डॉक्टर असले म्हणून काय झाले त्यांनाही याचे दुष्परिणाम होणारच.