सोलापूर : धर्मराज काडादी यांना काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर विधानसभेचे उमेदवारी द्यावी असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे शिफारस करणारी मंडळी लोकसभेला कोठे होती? असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.
लोकसभेला सोलापूरमधून काँग्रेसतर्फे प्रणिती शिंदे या निवडणूक लढवीत असताना भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करणारे नेतेच आता काळजी यांच्या उमेदवाराच्या शिफारशीसाठी शिंदे यांना साकडे घातल्याचे दिसून येत आहे. केला राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील, संचालक प्रमोद बिराजदार, प्रा.व्ही. के. पाटील, संचालक विद्याधर मुलगे तसेच तालुक्यातील सर्व शिवदारे गटाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे लोकसभेला कोणाचा प्रचार केला. विधानसभेला भाजपाकडून उमेदवारी मिळावी म्हणून सध्या कोण कोण प्रयत्न करीत आहे. असे असताना काँग्रेसपक्षाकडून उमेदवारी काडादी यांना मिळावी यासाठी मंडळींचा खटाटोप कशासाठी सुरू केला आहे. खासदार म्हणून मंडळींना प्रणिती शिंदे या नको होत्या तर आता आमदार म्हणून काडादी का पाहिजेत? असा सवाल दक्षिण सोलापूरचे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते करू लागले आहेत.
सर्व सामान्यांच्या अडचणीत कधीच ही नेतेमंडळी मदत करण्यासाठी दिसली नाहीत .शेतकऱ्यांची पिके वाळून जात असताना सीना- भीमानदीला व कॅनॉलमध्यें पाणी सोडा म्हणून सादे एक निवेदन देताना दक्षिण सोलापूर तालुक्याने या नेत्यांना कधीच पहिले नाही. शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी असतात. विजेचे डीपी जळाल्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यानां सांगून तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांना डीपी मिळवून दिला नाही, दुष्काळ पडून व अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले असताना, पिक विमा मिळाला नसताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कधीच यातील एकही मंडळी जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयात दिसली नाही. तहसील कार्यालयातील प्रश्न असो पोलीस स्टेशनं असो याचा काही संबंध नसलेली हि मंडळी एसीमध्यें बसून होती. आता हिच मंडळी दक्षिण सोलापुरात काँग्रेसला आघाडी मिळाल्यामुळे आमदारकीसाठी दावा करीत आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना या मंडळींनी गुपचूपपणे प्रायव्हेट लिमिटेड केला. शेतकऱ्यांचा ऊस गेल्यावर मनमानीने शेअर्सची रक्कम बिलातून कपात करून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करून पुन्हा प्रायव्हेट लिमिटेड कारखाना केला. याचा प्रचंड राग व रोष शेतकऱ्यांमध्यें आहे. याचा जाब येत्या विधानसभेत मते मागायला आल्यावर सभासद मंडळी विचारणार आहेत अशी काँग्रेस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
शेतकऱ्यांसाठी व सर्व सामान्यांसाठी नेहमीच श्माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री ही नेते मंडळी नेहमीच पूर्ण वेळ देऊन लोकांसोबत असतात. अशात या नेत्यामधूनच एकाला उमेदवारी पक्षाकडून मिळणार आहे हे समजल्यावरच भाजपाबरोबर असलेल्या लोकांना काँग्रेसच्या आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. प्रणितीताई नको पण काडादी हवे अशी संकल्पना भाजपाच्या नेत्यांनी काडादी यांना पुढे करून तिकडे स्वपक्षीय असलेल्या सुभाष देशमुख यांना अडचणीत आणून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हा उद्योग केला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यातून वेळीच धर्मराज काडादी यांनी या लोकांपासून सावध व्हावे, अन्यथा प्रत्यक्ष रणांगणात लढायची वेळ आल्यावर हेच मंडळी गायब होतील असा सावध इशारा कार्यकर्त्यांमधून दिला जात आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघाशी काही संबंध नसलेली शहर उत्तर व अक्कलकोटमधून असेलेली बरीच मंडळी दक्षिण सोलापूरच्या आमदारबाबत पुढे पुढे करीत आहेत. वेळ आल्यावर या मंडळींना दक्षिण सोलापूरमधील लोक उत्तर देणार आहेत असे एका काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने बोलताना सांगितले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जाई जुई फार्मवर गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी अनेकजण आले. त्यात अनेकजण दक्षिण सोलापूरची विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आले होते. आता यातील नेमक्या कोणाला गणपती पावणार? याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.