आता मुख्यमंत्री सोलापूरला येणार 25 सप्टेंबरला

Rajkumar Sarole
3 Min Read

सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पोलीस सहायक उपायुक्त वाहतूक अशोक खिरडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गुजरे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा हा दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी होम मैदान येथे होणार आहे. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. दिलेल्या जबाबदारी प्रमाणे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी अत्यंत दक्षपणे पार पाडावी. तसेच या सोहळ्यात येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबतची खात्री करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चाळीस हजार लाभार्थी बसण्याची व्यवस्था अत्यंत चांगली करावी. मंडप कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी समन्वय ठेवून महिला लाभार्थी व्यवस्थित बसतील यासाठी मंडपाचे सहा सेक्शन करावेत. व्यासपीठ प्रोटोकॉल प्रमाणे व्यवस्थित राहील हे पाहावे. पाऊस आला तरी मैदानात कुठेही चिखल होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद व अन्य महत्वाच्या विभागाने तसेच शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांचे किमान दहा ते पंधरा स्टॉल लावण्याच्या दृष्टीने नियोजन ठेवावे असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.

जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या चारशे बसेस साठी शहर पोलीस वाहतूक विभागाने पार्किंगची अत्यंत काटेकोरपणे व्यवस्था करावी. शहरात वाहतुकीला कोठेही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणापासून जास्तीत जास्त जवळ अशा ठिकाणी पार्किंग व्यवस्था ठेवावी. पुरवठा विभागाने जेवण, पाणी या बाबीवर अत्यंत दक्ष राहावे.

ज्या लाभार्थी महिला व्यासपीठावर जाणार आहेत त्यांची नावे तात्काळ महिला व बाल विकास विभागांनी क्लोज पासेस साठी पोलीस विभागाला सादर करावीत. सर्व संबंधित विभागांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही त्यांच्या विभागामार्फत या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती बैठकीत दिली. निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक विभागावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती दिली तसेच त्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामाविषयी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली.

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *