सोलापूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे सुभे आणि मजूर सोसायटीसाठी कामे मंजूर करण्यासाठी काढलेल्या निवेदन जिल्हा परिषदेला सुमारे अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात जिल्हा परिषदेकडे नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्यासाठी लॉटरी सोडत काढण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यात सुभेच्या 15 कामांसाठी 309 जणांनी सहभाग नोंदवला. मजूर सोसायटीच्या दहा कामासाठी 78 जण सहभागी झाले होते. या कामांच्या निविदेत सहभागी होणाऱ्याकडून जिल्हा परिषदेसाठी सहाशे रुपयेची फी घेतली जाते. पुण्यासारख्या जिल्हा परिषदा एक हजार रुपये फी घेतात. ही विना परताव्याची असते. झेडपीच्या सेस फंडात ही रक्कम जमा केली जाते. त्यामुळे झेडपीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होत आहे. मागील वार्षिक अंदाजपत्रात उत्पन्न वाढीच्या अनेक उपाय योजना सुचविल्या होत्या. जिल्हा परिषदेकडून विविध प्रकारचे सात दाखले दिले जातात. या दाखल्यांसाठी आकारलेल्या फीच्या माध्यमातून झेडपीच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे. विविध प्रकारच्या सोर्समधून झेडपीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.