सोलापूर :जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकारी कार्यालयामध्ये सरकारी कर्मचाऱ्याकडून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास अपमानास्पद वागणूक व मारहाण, शिवीगाळ त्याचा निषेध अभियंता संघटनेने केला आहे. या कार्यालयामध्ये चालणारी टक्केवारी बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा अभियंत्याने दिला आहे.
जिल्हा परिषद दोन दिवसापूर्वी घडलेल्या गंभीर प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन संबधित कर्मचाऱ्यावर कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्यावतीने राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची शुक्रवारी दुपारी भेट घेऊन सविस्तर लेखी निवेदन दिले आहे. याबाबतीत मला थोडा वेळ द्यावा याबाबत मी सविस्तर चौकशी करून न्याय देण्याचा प्रयत्न करतो असे शिष्टमंडळास आश्वासन दिले आहे.
याबाबतची माहिती अशी की राज्य अभियंता संघटनेचे राज्य सभासद मयुर पिंगळे हे आपल्या कामानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. यावेळी तिथे असलेले कर्मचारी मठपती यांना आपल्या कामाबाबत विचारणा केली असता तू सारखे येतो पण कामाचे मला पैसे देत नाही, मला व आमच्या वरीष्ठ अधिकारी यांना ठराविक फिक्स परसेंटज रक्कम दिल्याशिवाय तुझे काम होणार नाही. तसे तुझ्या कामांच्या फाईलवर आम्ही शेरा मारून तुझी फाईल परत पाठवली आहे असे सांगितले. तसेच आवाज चढवून, दमदाटी, शिवीगाळ करुन, सदर अभियंत्यांस मारहाण करुन त्याचा शर्ट फाडला व सरकारी कर्मचारी असल्याचा रुबाब दाखवून तु बाहेर जिल्हा परिषद आवारात ये तुला दाखवतो असा दम दिला. हा सर्व प्रकार अभियंत्यांनी लिखित स्वरूपात पत्राद्वारे त्याच वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटुन दिला होता. हाच धागा पकडून व आपल्याला काहीतरी होऊ नये महणून सरकारी कर्मचारी यांनी उलटपक्षी खोटे पुरावे दाखवुन कंत्राटदार यांनीच आम्हाला शिवीगाळ केली असा खोटा अपप्रचार करून निषेध आंदोलन १७ ऑक्टोबर रोजी जिप कार्यालयमध्ये केले आहे. वास्तविक शासनाची कडक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असताना सरकारी कर्मचारी यांना आंदोलन करता येतच नाही. मग हे आंदोलन कुणाच्या परवानगीने झाले, कसे पार पडले हा विषय गंभीर स्वरुपात राज्य अभियंता संघटनेने घेतला आहे, तसेच बेरोजगार अभियंता यांना मारहाण,शिवीगाळ, अरेरावी,करण्याचा सरकारी परवाना सदर सरकारी कर्मचारी यांना कुणी दिला? या विषयी राज्य मुख्य सचिव, मुख्य निवडणूक आयोग यांच्याकडे राज्य अभियंता संघटना तक्रार करणार आहे. या शिष्टमंडळमध्ये कैलास लांडे, सतीश शेंडे, सतीश मोटे एजाज पठाण, शिवराज निंबाळकर, अनिल देशमुख, नवनाथ भिसे, राजेंद्र मोठे, संतोष शेंडगे, ओंकार पांढरे, तनवीर पठाण, संजय माने, किशोर चव्हाण, वैभव वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, अतुल सुरवसे, विकी तिकिटे, निखिल जाधव, सौरभ मगर, मेघराज चव्हाण आदी कंत्राटदार व सुबे अभियंता उपस्थित होते.