सोलापूर : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कर्नाटकातून सोलापुरात गावठी पिस्तूल विक्री करण्यास आलेल्या रेकार्डवरील गुन्हेगार व पिस्टल विकत घेणाऱ्यास शिताफीने अटक केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य टोळी व रेकॉर्डवरील गुन्हेगारावर वॉच ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने परिसरात वॉच ठेवला आहे. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांना कर्नाटकातील एक गुन्हेगार पाकणी फाटा येथे गावठी पिस्टल विकण्याकरता आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी फौजदार ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, हवलदार विजयकुमार पावले, धनाजी गाडे, सागर ढोरे, मोहन मनसावले, सलीम बागवान, अक्षय डोंगरे यांच्या मदतीने पाकणी फाटा येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून गावठी पिस्टल विक्रीसाठी आणलेल्या करीम हमीद मुरली (वय 28, राहणार खजुरी, जिल्हा कलबुर्गी ) याला व पिस्टल विकत घेणाऱ्या चंदू लांडगे (वय 38, राहणार बसवेश्वरनगर, कुमठे रोड सोलापूर) याला दोन जिवंत काडतुसासह अटक केली. यातील आरोपी करीम याच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात खुनाचा व कर्नाटकात बेकायदा शस्त्र बाळगल्याचे गुन्हे आहेत तर आरोपी चंदू याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे वळसंग पोलीस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी करीम याच्याकडून पिस्टल विक्रीच्या व्यवहारातले 5000 व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *