सोलापूर : अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांनी आचारसंहितेच्या काळातच अक्कलकोट तालुक्यातील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अक्कलकोटचे गट शिक्षणाधिकारी परमेश्वर अरबळे हे गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असतानाच त्यांनी नावदगी येथील शाळेला भेट दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. आरबळे यांनी नावदगीतील रेवू गोडवस्ती शाळेला भेट दिली आहे. या शाळेकडे जाणारा रस्ता पाणी व चिखलाने माखलेला असल्याने चालत जाणे ही मुश्किल झाले आहे. या शाळेला विद्यार्थी व शिक्षक कसे जात असतील? याची दुरावस्था गट शिक्षणाधिकारी आरबळे यांनी या व्हिडिओतून दाखवली आहे. या शाळेला भेट देण्यासाठी चिखलातून वाट काढत ते स्वतः जात असलेला व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गट शिक्षणाधिकारी आरबळे यांनी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था चव्हाट्यावर आणली असली तरी सध्या शासकीय अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या काळात अशा गोष्टी करणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांची दाखवलेली दुरावस्था निवडणुकीच्या काळात कळीचा मुद्दा बनू शकते. शासकीय अधिकाऱ्यांनीच गावातील अशा समस्येचा असा व्हिडिओ ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात व्हायरल करण्यामागचा उद्देश काय? पालक व ग्रामस्थांनी याबाबत तक्रार का केली नाही? गटशिक्षणाधिकारी आरबळे यांनी आत्ताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून सवाल का उपस्थित केला? असे अनेक प्रश्न आता नेटकरी उपस्थित करीत आहेत.