सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच मोची समाजातील नेत्यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसचे  माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, माजी स्थायी समिती सभापती सिद्राम अट्टेलुर,माजी नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे,माजी नगरसेविका सरस्वती सिद्राम कासलोलकर,माजी नगरसेवक जेम्स जंगम व काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर यांचा समावेश आहे. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,शहराध्यक्ष नरेंद्र काळे,शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर,भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने,बाबुराव क्षीरसागर उपस्थित होते.

सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत मोची समाजातील उमेदवाराला प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. पण काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या मोची समाजातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले. खासदार प्रणिती शिंदे यांनी नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. काँग्रेस पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात असतानाच मोठी सभा यातील पदाधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबल झाले. सोलापूर शहर मध्य च्या प्रचारातून अनेक पदाधिकारी गायब झाल्याने पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर बुधवारी  संभाजीनगरहुन ही बातमी आली. काँग्रेसने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावरून आपला हक्क सोडल्यानंतरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा सोडून काँग्रेसचे पदाधिकारी अपक्ष उमेदवाराच्या व्यासपीठावर फिरताना दिसत आहेत. आता अशीच परिस्थिती सोलापूर शहर मध्य मतदार संघात निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहाजी भाऊनी गड सर केला

केद्रीयमंत्री रावसाहेब दानवे 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची निवडणूक यशस्वी करण्यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व अविनाश महागावकर यांच्यावर जबाबदारी दिली होती. शहाजी पवार यांनी मतदार संघात यंत्रणा कामाला लावली. त्यात काँग्रेसच्या वरील नाराजांना भाजपात आणण्यासाठी त्यांनी मोठी जबाबदारी पार पडल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *