सोलापूर : कामावरून काढल्यावरून माळशिरसचे बीडीओ आबासाहेब पवार यांना कंत्राटी कर्मचाऱ्याने घरात घुसून काठीने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याप्रकरणी बीडिओ आबासाहेब पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल बाबासाहेब पाटील (रा. तासगाव, जिल्हा सांगली) या कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल पाटील हा 12 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास बीडिओ पवार यांच्या घरी आला. घरात घुसून त्याने बीडीओ पवार यांना शिवीगाळ करीत हातातील काठीने मारहाण केली. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, जर मला परत कामावर घेतले नाही तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, इथे नोकरी कशी करतो तेच पाहतो, अशी धमकी देत त्याने खिशातील पाच हजाराची रोकड जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. आरोपी अमोल हा जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होता. पण नेमून दिलेली कामे तो वेळेवर करीत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या कारवाईचा राग मनात धरून त्याने बीडिओ पवार यांना मारहाण केली. इव्हीएममुळे माळशिरसमधील वातावरण तापलेले असतानाच या प्रकारामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.