मोहोळमध्ये “या’ ठिकाणी होत आहे बेकायदा वाळू उपसा

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील विरवडे, शिंगोली, पिर टाकळी येथे सिना नदीतून राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. पोलीस व महसूल विभागाकडून या ठिकाणी कोणतीही प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई केली जात नाही, दररोज या ठिकाणाहून यारीने व इतर यंत्राच्या सहाय्याने 20 ते 30 गाड्या वाळूची विक्री होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ तहसीलदार मुळीक यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा कारवाई करण्यास चालढकल करण्यात येत असल्याचे तक्रार मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विरवडे, शिंगोली, पिरटाकळी व मिरी या ठिकाणाहून दररोज वाळू काढून विकणाऱ्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात दिली आहे. सिना नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यावर व संबंधित ठिकाणाची पाहणी करून तात्कळ पंचनामे करून दंडात्मक व पर्यावरण कायद्यानुसार फौजदारी कारवाई करून सर्व यंत्र सामग्री जप्त करण्यात यावी. तसेच तेथील अकार्यक्षम तलाठी व मंडल अधिकारी यांची बदली करण्यात यावी, अशी तक्रार गणेश मोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व मोहोळचे तहसीलदार मुळीक यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात वाळू घाटाचे लिलाव झालेले नाहीत. प्रशासनाने घरकुलासाठी स्वस्तात वाळू देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. पण या प्रणालीवर परस्पर नोंद करून स्वस्तातील वाळू बाहेर काळ्या बाजाराने 6 हजार ब्रासनेे विकली जात आहे. त्यामुळे गरजू लोकांना शासनाची स्वस्तातली वाळू मिळतच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या गंभीर प्रश्न लक्ष घालून वाळू तस्करांच्या मुश्क्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे.