
सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचे मंगळवारी सकाळी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या दरम्यान हृदयविकाराने निधन झाल्याचे वृत्त आहे. कोठे यांच्या निधन झाल्याच्या वृत्ताने सोलापुरातील राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे.
कुंभमेळ्यासाठी महेश कोठे हे आपल्या मित्रासह प्रयागराज येथे गेले होते. मंगळवारी सकाळी नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडल्यानंतर कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली.
आमदारकीचे स्वप्न अधुरे…
महेश कोठे यांचे वडील स्वर्गीय विष्णुपंत कोठे हे काँग्रेसचे निष्ठावंत होते. त्यांच्या हयातीत काँग्रेसने न्याय दिला नाही म्हणून कोठे यांनी काँग्रेस सोडली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाऊन त्यांनी तीन वेळा विधानसभा लढवली. पण या त्यांना यश आले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे त्यांनी शहर उत्तर मध्ये निवडणूक लढवली. त्यांना यश आले नाही पण पुतणे देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मधून आमदारकी पदरात पाडण्यात यश मिळवले. महापालिकेच्या राजकारणात महेश कोठे किंगमेकर म्हणून राहिले. मुलगा प्रथमेश कोठे यांच्याबरोबर कुटुंबातील सात सदस्यांना त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आणले. शहराच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शहर विकास आराखडा असो किंवा पाणी प्रश्न, यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. गाळे भाडे वाढ, मिळकत कर वाढ असो यात ते नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताच्या बाजूने राहिले. त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याचा अनेकांना धक्का बसला आहे.