जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता; गेले आरोग्य सेवकाच्या घरी

सोलापूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाते कसे असायला हवे? याकडे सोलापुरातील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आल्यानंतर आपला एक जुना कर्मचारी आजारी आहे असे कळल्यावर थेट त्याच्या घरी गेले. चक्क जिल्हाधिकारी आपल्या घरी आले आहेत हे पाहून त्यांच्या घरच्यांनाही खूप समाधान वाटले.
सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना दिलीप स्वामी यांच्या सिईओ टीममध्ये असलेले आयटी सेल व जनसंपर्क कक्षात काम करणारे त्रिमुर्ती राऊत यांचा पंधरा दिवसापुर्वी पाय मुरगळल्यामुळे फ्रॅक्चर झाले होते.
सोलापूर जिल्हा परिषदेत जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांना राऊत यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजले. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अवंतीनगर येथील निवासस्थानी जाऊन आरोग्यसेवक त्रिमुर्ती राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना पुष्पगुच्छ व फळे देऊन प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आशिर्वाद दिले. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, मल्लिकार्जुन राऊत, जिल्हा परिषदेचे पतसंस्थेचे चेअरमन डॉ. शत्रुघ्न माने व नवनाथ वास्ते, डॉ. कल्याणी राऊत, ऋषिकेश राऊत उपस्थित होते.त्रिमुर्ती राऊत यांनी तत्कालीन सिईओ दिलीप स्वामी यांच्या कालावधीत विविध उपक्रमांत सहभागी होऊन आयटी सेलची धुरा सांभाळली होती. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासमवेत जनसंपर्क कक्षात विविध माहितीपट बनविण्याबरोबर सोशल मिडियाचे काम हाताळले होते. त्यामुळे आपला पूर्वीचा सहकारी कर्मचारी आजारी असल्याचे कळताच संवेदनशील असणारे दिलीप स्वामी यांना रहावले नाही. त्यांनी थेट राऊत यांचे निवासस्थानी जाऊन त्यांना आजारपणात धीर देऊन लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याबद्दल असलेल्या प्रेमाची प्रचिती या भेटीतून आली असल्याची चर्चा सुरू आहे.