मंद्रूप येथे पिण्याच्या पाण्यासाठी “संक्रांत’

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे गेल्या वीस दिवसापासून पाणीपुरवठा न झाल्यामुळे ऐन संक्राती सणदिवशी नागरिकांनी बादल्या घेऊन ग्रामपंचायतीवर धडक मारली आहे.
मंद्रूप येथे यापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेतून कोट्यावधी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. गेल्या तीन वर्षापासून योजना पूर्ण होऊनही अनेक कामे अपूर्ण असल्याने नव्या योजनेतून मंद्रूप गावाला पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. अशात वेळी अवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वार्ड क्रमांक सहामधील कुंभार गल्ली येथे गेल्या वीस दिवसापासून पाणीपुरवठा झाला नाही. सध्या संक्रातीनिमित्त मंद्रूपचे ग्रामदैवत श्री मळसिद्ध देवालयाची यात्रा सुरू आहे. तसेच सणामुळे मंद्रूपमध्ये पाहुणेरावळ्यांची गर्दी झाली आहे. अशात ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. संक्राती दिवशीच पाणी न आल्याने सम तप्त झालेल्या महिलांनी मुलाबाळांसह बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारला.
मंद्रूप ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्राम विकास अधिकारी नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेची ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र शासनाने माजी वसुंधरा उपक्रमांतर्गत मंद्रूप ग्रामपंचायतीला राज्यात पहिला क्रमांक दिला आहे. पण पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र सुटलेली नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. घराघरात नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने आता नव्याने जलजीवन ही योजना आणली आहे. पण मंद्रूप ग्रामस्थांना या योजनेचा फायदा झालेला नाही. भीमा नदी जवळ असूनही पाणी मुबलक असताना केवळ नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना फटका बसत असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.