सोलापुरात गड्ड्यावर आल्यावर स्वस्त अन मस्त खायचे असेल तर रुक्मणी महोत्सवला द्या भेट

सोलापूर : उमेदने महिलांच्या उत्पादनासाठी, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सोलापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व रूक्मिणी महोत्सवचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे, आरोग्यअधिकारी डॉ. संतोष नवले, उत्तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, माविमचे सोमनाथ लामगुंडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महिलाना चूल व मूल या संकल्पनेतून बाहेर काढण्यासाठी उमेद अभियान यांचा मोठा सहभाग आहे.तसेच त्यांनी सोलापूरच्या उमेदच्या कामाचे कौतुक केले. यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, सोलापूरमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूरबरोबरच पुणे, मुंबई येथेही प्रदर्शन भरविण्यात यावे. त्यासाठी सर्व मदत करण्याची तयारी असल्याचे सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, उमेदच्या माध्यमातून महिलांना लखपती करण्यासाठी व त्यांचे उद्दोग व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना वैयक्तिक कर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंचे 75स्टॉल लावण्यात आले आहेत. सदर प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादने, लाकडी तेलघाण्यावरील तेल, लाकडी खेळणी, मसाले, मिलेट कुकीज, तृणधान्य चिवडा आदी उत्पादनांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाच्यावेळी उमेद अभियानमधील काही यशस्वी महिलांच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदपाठक यांनी तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे,जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने, अमोल गलांडे, शीतल म्हांता, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.
महिलांच्या उत्पादनासाठी मार्केट मिळविण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी तयार आहे.
सुभाष देशमुख
आमदार