सोलापूरकृषीजिल्हाधिकारी कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिद्धेवाडीच्या शेतकऱ्याला मिळाला ड्रोन सर्व्हेचा उतारा

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रमुख उपस्थितीत शनिवारी देशभरात स्वामित्व योजनेतून ड्रोनद्वारे सर्व्हे केलेल्या शेती व जागांचे डिजिटल उतारे वाटप करणेत आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सिद्धेवाडीच्या साहेबराव जाधव या शेतकऱ्याला डिजिटल उतारा घेण्याचा मान मिळाला.

देशातील २४६ जिल्ह्यातील ५८ लाख लाभार्थी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेहस्ते आभासी पध्दतीने सनद वाटप कार्यक्रम झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील ३९ गावांमधील ४ हजार ८५९ स्वामित्व सनद वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सीईओ कुलदीप जंगम व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.स्वामित्व सनद वाटप कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी होते तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा भूमिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके, नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ, स्वच्छ भारत मिशन कक्षचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामपंचायत सदस्य आप्पा जाधव, सुरेश गोडसे, शरद जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वामित्व योजनेबाबतचे व ग्रामीण विकासाबाबतचे महत्व सर्वांना पटवून सांगितले. या अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा एक प्रयत्न आहे. त्यानुसार केद्र शासन, भूमि अभिलेख विभाग व ग्रामविकास यंत्रणामार्फत लोकांना स्वांतत्र्यपूर्व काळापासुन अद्यापपर्यंत न झालेले त्यांचे घरांचे अभिलेख तयार करुन त्यांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून प्रत्येक गावठाणामधील घरांचा नकाशा व सनद अत्याधूनिक ड्रोन सर्व्हे द्वारे तयार केले आहेत. या तयार झालेल्या अभिलेखामुळे गावामधील लोकांना देखील गृहकर्ज मिळणेस मदत होणार आहे. त्या मिळणा-या कर्जामुळे लघु उद्योगधंदे यांना चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख घोडके यांनी स्वामित्व योजनेचे व सनदेचे महत्व विषद केले व त्यासंदर्भातील चित्रफित सादर केली. यावेळी जिल्ह्यातील ३९ गावांमधील ४८५९ नागरिकांना स्वामित्व हक्काची सनद मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सचिन कल्याणशेट्टी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सनद वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडके यांनी केले तर आभार गजानन पोळ यांनी आभार मानले.

स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांशा पुर्ण करत आहे. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे स्वामित्व योजनेंतर्गत सनद वितरणाचा शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृह येथून ऑनलाईन उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त व संचालक डॉ.सुहास दिवसे, विभागीय आयुक्त राजेश देशमुख तसेच पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या पथदर्शी प्रकल्पात महाराष्ट्राचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” असा दृष्टिकोन आहे. ग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या प्रगतीचा आधार आहे, ही जाणीव ठेवूनच स्वामित्व योजना आखण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ६० लाख हून अधिक कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल. ही योजना केवळ शासकीय उपक्रमापुरती मर्यादित नसून, ती ग्रामीण भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय प्रणालीत आमूलाग्र बदल घडविणारी आहे. ग्रामीण भागातील जमिनीच्या मालकीबाबतची अनिश्चितता आणि वाद कमी होणार आहेत. अनेकांना जमिनींचा कायदेशीर हक्क सिद्ध करणे कठीण जाते. यामुळे केवळ न्यायालयीन प्रकरणे वाढतात. अनेकदा विकास प्रक्रियादेखील थांबते. या समस्येचे स्वामित्व योजनेमुळे निराकरण होईल. या योजनेद्वारे गावांतील जमिनींची मोजणी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मालकीच्या जमिनीचे कायदेशीर प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र केवळ मालकीचा पुरावा नसून, त्यामागे आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button