धाराशिव : धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील जुन्या काळचे शेतकरी शिवाजीराव सदाशिवराव चव्हाण यांचे वृद्धापकाळाने मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 96 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा सून, नातवंडे- परतुंडे असा मोठा परिवार आहे.

करजखेडा येथील प्रगतशीतील शेतकरी श्रीराम चव्हाण, एस. ई. एस. ज्युनियर कॉलेजमधील प्राध्यापिका पद्मिनी सारोळे, बार्शी तालुक्यातील तडवळे येथील यशवंतराव चव्हाण प्रशालेतील वरिष्ठ लिपिक मोहिनी सुधीर पाटील, हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील सेवेकरी रेषाबाई बालाजी जिरगाळे यांचे वडील होत. तसेच त्यांना निवृत्त प्राध्यापक महादेव सदाशिव चव्हाण, गौतम सदाशिव चव्हाण हे भाऊ असून त्यांचाही मोठा गोतावळा आहे. सोलापूरचे वरिष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे यांचे ते सासरे होत.

चव्हाण परिवाराचा गोतावळा…

शिवाजीराव चव्हाण यांच्या वडीलाचे नाव सदाशिव माधव चव्हाण असे आहे. ते हिप्परगा येथील रामानंद तीर्थ शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. करजखेडा येथे त्यांची शेती असल्यामुळे ते गावी आले. जुन्या करजखेडा या गावी मध्यभागी त्यांचा वाडा आहे. वाड्यामध्ये पद्माई देवीचे मंदिर आहे. भजन कीर्तन, गाथा, भारुड यातून लोकांना चांगले संस्कार करण्याचे व्रत सदाशिव यांनी अंगीकारले. त्यामुळे अनेक संतांचा त्यांना सत्संग लाभला. त्यांना शिवाजीराव, बलभीम, कांताबाई, गौतम आणि महादेव अशी पाच अपत्ये होती. शिवाजीराव यांना लहानपणापासून पैलवानकीचा छंद होता. जुनी एलिफंट्रीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. त्यामुळे गणित व हिशोबात त्यांचा कोणीच हात धरू शकत नसेल. वडिलांचे मोठी शेती असल्यामुळे व घरात तेच मोठे असल्याने नोकरी ऐवजी शेतीच सांभाळण्याची त्यांच्यावर जबाबदारी आली. त्यामुळे बरिच वर्षे ते शेतीच करत होते. त्यांचे उत्तराबाई यांच्याशी लग्न झाले. त्यांना श्रीराम हा एकुलता मुलगा तर मोहिनी, रेषाबाई व पद्मिनी अशा तीन मुली आहेत. वाड्यातील पद्माई देवीच्या आठवणीसाठी लहान मुलीचे नाव त्यांनी पद्मिनी हे ठेवले. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी सोलापूर गाठले. मुलगा श्रीराम यांच्याकडे बरीच वर्षे मोठ्या ट्रक्स होत्या. भूकंपात वाडा जमीनदोस्त झाला असला तरी पद्माई देवीचे अस्तित्व अजून तेथेच आहे. श्रीराम यांचा तुगाव येथील सुकेशना यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना रोहित, ऋचा व प्राजक्ता अशा दोन मुली आहेत. ऋचा हिचा विवाह लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील सूर्यकांत देशमुख यांच्याबरोबर झाला असून त्यांना शिवण्या ही कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे परतंडे पाहण्याचा योग शिवाजीराव यांना आला. मोठी कन्या मोहिनी यांचा विवाह वैराग येथील सुधीर पाटील यांच्याबरोबर झाला असून त्यांना राजवर्धन हा मुलगा आहे. रेषाबाई यांचा विवाह कुमठा येथील बालाजी जिरगाळे यांच्याबरोबर झाला असून ते हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत चालक म्हणून सेवेत आहेत. त्यांना श्रद्धा, ऋतू आणि शुभम अशी तीन आपत्ये आहेत. छोटी मुलगी पद्मिनी हिचा विवाह  मंद्रूप येथील पत्रकार राजकुमार सारोळे यांच्याशी झाला आहे. त्यांना सई व विठ्ठल अशी दोन अपत्य आहेत.

चव्हाण परिवारातील बलभीम व कांताबाई यांचे कालांतराने निधन झाले. शिवाजीराव यांचे तिसरे बंधू गौतम हे शेतीच करत असून त्यांनाही बबलू उर्फ कृष्णा हा एक मुलगा व शशिकला, अर्चना, पिंकू, छकुली या चार मुली आहेत. बबलू यांचा विवाह भातागळी येथील गोकर्णा यांच्याशी झाला असून यांनाही जान्हवी, ईश्वरी, ज्ञानेश्वरी अशा तीन मुली आहेत.

धाकटे बंधू महादेव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले.  त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील बी.के. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून 32 वर्षे काम केले. सेवानिवृत्तीनंतर ते करजखेडा येथे स्थायिक झाले आहेत. महादेव यांचे लग्न बंधू गौतम यांच्या पत्नी भारताबाई यांच्या भगिनी सुशिलाबाई यांच्याबरोबर झाले आहे. त्या गृहिणी असून त्यांना मुलगा शिवप्रसाद, रंजना, अंजली व मंजुषा अशा तीन मुली आहेत. मुलगा शिवप्रसाद यांनी इंजिनिअरिंग केले असून पुणे- बेंगलोर हायवेवर सातारा येथे त्यांनी श्रीराम इंडस्ट्रीज नावाने स्वतःची कंपनी काढली आहे. त्यांच्या पत्नी शिल्पा याही इंग्लंडमध्ये नोकरीला होत्या. कन्यारत्न झाल्यामुळे त्या पुण्याला परतल्या आहेत. डॉ. रंजना या सातारा कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असून पती डॉ. विक्रम माने हे धाराशिव येथील तेरणा इंजनियरींग कॉलेजचे प्राचार्य आहेत. दोन नंबर कन्या अंजली गव्हाणे या सातारा पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत तर तिसऱ्या कन्या मंजुषा अरविंद पेडणेकर या पुण्यातील बीआयसीमध्ये कार्यरत आहेत.

निजाम सैन्याबरोबर झटापट…

हैदराबाद मुक्ती संग्रामाच्याआधी निझाम सैनिक येथील शेतकऱ्याकडून सक्तीने धान्यरूपाने सारा वसूल करत. निझामाच्या सैन्याला शिवाजीराव यांनी कर देण्यास कडाडून विरोध केला होता. यावेळी झटापट होऊन सैनिकाने त्यांच्यावर गोळी झाडली होती. पायाला छरे लागल्यामुळे भूमिगत होऊन ते सोलापुरात आले होते. लिंगशेट्टी यांच्याकडे त्यांनी मुनीम म्हणून काही काळ काम पाहिले. त्याकाळी पंचक्रोशीत पैलवान म्हणून ते प्रसिद्ध होते. अनेक यात्रांच्या कुस्ती फडामध्ये नामवंत मल्लाना त्यांनी चितपट केले होते. बऱ्याच वेळा त्यांना कुस्ती खेळण्यासाठी त्यांना जोडीदार मिळत नसे. उंची व शरीरयष्टी पाहून बरेच पैलवान त्यांच्याशी कुस्ती खेळण्यास तयार होत नसत.त्यांच्या अंत्ययात्रेस विविध स्तरातील मंडळी उपस्थित होती.

आठवणीतील फोटो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *