सोलापूर झेडपीने हे काय केले? उपक्रमशील शिक्षकालाच घरी बसवले

सोलापूर : काही अधिकाऱ्यांचा हट्ट पुरवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक गमती जमती घडत असतात. सध्या अक्कलकोट शिक्षण विभाग चर्चेत आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या हट्टासाठी एका उपक्रमशील मुख्याध्यापकाला घरी बसावे लागले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी लोकप्रतिनिधीच्या घरी धाव घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच तक्रारदार मुख्याध्यापकाला घरी बसवण्याचा पराक्रम अक्कलकोट गटविकास अधिकाऱ्यांनी केला आहे.
अक्कलकोट तालुका शिक्षण विभागातील नियमबाह्य बदल्याबद्दल शिक्षक संघटनेने तक्रार केली होती. या तक्रारीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी सुरू केल्यानंतर तक्रार करणाऱ्या मैंदर्गी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्याविरुद्धच्या तक्रारीचा अहवाल गट विकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. त्यावरून गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक कट्टीमनी यांना निलंबित केले आहे तर प्रभारी गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबाळे यांच्या विरुद्धच्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. सीईओ जंगम यांनी दिलेल्या आदेशावरून अद्याप कारवाई झालेली नसताना रीतसर तक्रार करणाऱ्या शिक्षकांवरच कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे सीईओंचा आदेश महत्त्वाचा की गटशिक्षण अधिकाऱ्याचा अहवाल महत्त्वाचा असा आता प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमके काय घडले…
मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक कट्टीमनी यांना गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अहवाल पाठविला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध चौकशी सुरू असताना तक्रार केलेल्या शिक्षकांवरच कोणतीही नोटीस व चौकशी न करता कारवाई करणे म्हणजे आपसातील दुश्मनी काढण्याचा प्रकार प्रशासनात सुरू झाल्याची चर्चा कर्मचाऱ्यात रंगली आहे. राजकीय हस्तक्षेपातून हे घडले असेही बोलले जात आहे. काही असले तरी प्रशासनाची कारवाईसाठी नियमावली आहे. तालुकास्तरावर गोंधळ सुरू असेल तर प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याचा गोंधळ एकच असेल तर ठीक पण अनेक तक्रारी असूनही प्राथमिक शिक्षण विभाग दखल घेत नसेल तर इतर क्रियाशील शिक्षकांवर याचा परिणाम होणार असल्याची चर्चा रंगली आहे. गावात यात्रा असल्याचे रेकॉर्डला दाखवून गेल्या आठवड्यात काही शिक्षकांनी शाळा बंद ठेवली होती. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याला दिले होते. या चौकशीतही गोंधळ असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याने आता प्रत्यक्ष शाळांमध्ये येऊन चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
पालक गेले लोकप्रतिनिधींकडे…
मैंदर्गी शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात आल्याने संतप्त झालेले पालकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या मारला. संबंधित शिक्षकाला न्याय मिळेल असे आश्वासन मिळाल्यानंतरच पालकांनी तेथून माघार घेतली. मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी मैंदर्गी कन्नड शाळेचा पदभार घेतल्यानंतर मोठ्या सुधारणा केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमात भाग घेऊन शाळेचे रूप पालटले आहे. परसबाग, पोषण आहार, गणवेश यामध्ये गुणवत्ता राखल्याने विद्यार्थी खुश आहेत. विमानाने मोठ्या प्रेक्षणीय स्थळांना भेटीमुळे पालक खुश आहेत. त्यामुळे शाळेचा पट वाढला आहे. कर्नाटक सरकारने कट्टीमनी यांच्या उपक्रमाचे दखल घेत त्यांचा सन्मान केला आहे. असे असताना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मात्र एका अधिकाऱ्याचा हट्ट पुरवण्यासाठी अन्यायकारक भूमिका घेतल्याचा संताप पालकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.