राजकुमार सारोळे, फुलारी, मुंजे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

सोलापूर : ग्रामीण भागातील पत्रकारांनी वंचितांच्या व्यथा लेखणीतून मांडल्यामुळे ते विकासाच्या प्रवाहात सामिल होत आहेत. त्यामुळे वंचित घटकांच्या विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले.
दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशन व श्री सिध्देश्वर सामाजिक बहुउद्देशिय संस्था यांच्यावतीने आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हतुरे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळे, उपसरपंच भगवान व्हनमाने, दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे संस्थापक रेवणसिध्द मेंडगुदले, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे,संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर मोरे, लोकसेवा विद्यामंदिरचे प्राचार्य बसवराज कुमठेकर, बरूरचे प्रगतशील शेतकरी विक्रांत हविनाळे, पशु वैद्यकीय अधिकारी प्रणाली क्षीरसागर, असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अमोगसिध्द मुंजे उपस्थित होते.
सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी प्रशासनात काम करताना अनेक अडचणी येत असतात. पोलिसांकडून दोन्ही बाजूला न्याय मिळेलच असे नाही. एक जण खोटे बोलत असतानाही न्यायाची अपेक्षा करतो. त्यामुळे परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. दोन्ही बाजू समजावून घेऊन पत्रकारांनी लिखाण करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी बोलताना मळसिध्द मुगळे म्हणाले की, ग्रामीण पत्रकारांना अडचणींना सामोरे जाऊन पत्रकारीता करावी लागते. आर्थिक अडचणीमुळे अनेक प्रश्न उद्भवतात. दक्षिण सोलापूरचे पत्रकार सामान्यांच्या न्याय व विकासासाठी लेखणीतून वास्तव मांडत असतात, असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी मुळे यांनी अलीकडच्या काळात कृषी पत्रकारिता महत्त्वाची झाल्याचे सांगितले.
यावेळी भाजपाचे प्रशांत कडते, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, सुरेश टेळे, सूर्यकांत जोडमोटे, यासीन मकानदार, ग्रामपंचायत अधिकारी नागेश जोडमोटे, कृषी सहायक रमेश फरताडे, निलेश हेळकर, महेश मेंडगुदले, शिवराज कालदे, सिध्दाराम काळे, सिध्दलिंग म्हेत्रे, प्रविण कुंभार, रविशंकर म्हेत्रे, अप्पू शिळ्ळे, रमेश वाघमोडे, अनमोल केवटे, राम गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोगसिध्द मुंजे यांनी केला. सूत्रसंचालन नंदकुमार वारे यांनी केले तर आनंद बिराजदार यांनी आभार मानले.
या पत्रकारांना पुरस्कार प्रदान
यावेळी पत्रकार राजकुमार सारोळे यांना ज्येष्ठ आदर्श पत्रकार पुरस्कार तर लोकमतचे अक्कलकोटचे प्रतिनिधी शिवानंद फुलारी, दैनिक तरुण भारतचे मंद्रूपचे प्रतिनिधी अमोगसिध्द मुंजे, श्रीकांत हाले, नारायण घंटे यांना आदर्श पत्रकार म्हणून शाल, ट्राॅफी, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सारोळे व फुलारी यांनी ग्रामीण भागात पत्रकारिता करताना अनेक अडचणी येतात असे सांगितले. दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे रेवणसिद्ध मेंडगुदले यांनी जिल्ह्यात ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचा चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल कौतुक केले.