झेडपीचे अधिकारी व पत्रकार उद्या समोरासमोर भिडणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा ६ व ७ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. नेहरूनगर येथील शासकीय मैदान, जय जवान शाळेचे मैदान आणि ऑफिसर्स क्लब येथे क्रीडा स्पर्धा तर 8 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख प्रशासनाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा व सांस्कृतिक होणार आहेत. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता डीएड कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे सर्व पंचायत समिती व मुख्यालय पथकाचे निरीक्षण करून क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतील. त्यानंतर नेहरूनगर येथील मैदानावर जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार यांच्यात उद्घाटनाचा फ्रेंडली क्रिकेट सामना होईल. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहप्रमुख तथा अतिरिक्तत मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, एस.बी. ठोंबरे, विशेष निमंत्रीत सदस्य नरेंद्र पवार, सचिव स्मिता पाटील, सहसचिव अनिल जगताप, संजय सांवत, सदस्य मिनाक्षी वाकडे., इशाधिन शेळकंदे, अमोल जाधय, एस. व्ही. कुलकर्णी, कादर शेख, संतोष नवले, प्रसाद मिरकले,सांस्कृतिक विशेष निमंत्रीत सदस्य सिमा यलगुलवार, सुमित फुलमामडी, प्रशांत बडवे, गोवर्धन कमटम,किरण लोंढे, क्रीडा विशेष निमंत्रीत सदस्य रविंद्र चव्हाण, गणेश पवार, संतोष जाधव, सचिन जाधव, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, गिरीष जाधव हे विशेष परिश्रम घेत आहेत.
जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडूवृती, परस्पर समन्वय, सहनशीलता, ताणतणावाचे व्यवस्थापन इत्यादी मूल्ये वाढीस लावून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असून या स्पर्धेतून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना वाढीस लागून नव्या जोमाने जि प प्रशासनाच्या सर्व योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कार्यास नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य् कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.