सोलापूर झेडपीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना धो.. धो… धुतले

सोलापूर : एरव्ही कामात होणाऱ्या चुका पकडून अधिकाऱ्यांना हैराण करणाऱ्या पत्रकारांना आज मात्र झेडपीच्या अधिकाऱ्यांनी धो.. धो… धुतले. पत्रकारांनीही शर्थ केली पण खेळात काहीही होते. पत्रकारांच्या बॉलिंगवर अधीकाऱ्यांनी जोरदार फटकेबाजी करीत धुवाधार धावा काढल्या. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांची धुवाधार बॅटिंग रसिकांना पहावयास मिळाली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांना गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. नेहरूनगर येथील मैदानावर उद्घाटना अगोदर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व पंचायत समितीच्या टीमची पाहणी केली. त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नेहरूनगर येथील मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी व जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात 8 ओव्हरचा फ्रेंडली क्रिकेट सामना झाला. सीईओ जंगम यांनी टॉस उडवल्यानंतर अधिकारी टीमच्या बाजूने टॉस आला. अधिकारी टीमचे कर्णधार संतोष कुलकर्णी यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पत्रकार संघाचे कर्णधार प्रशांत कटारे व अप्पा पाटील यांची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. या दोघांनी जोरदार फटकेबाजी करत धावांचा डोंगर रचला. शेवटी इतर खेळाडूंना संधी मिळावी म्हणून हे दोघे पॅवेलियनकडे परतले. त्यानंतर संदीप येरवडे यांनीही धावांचा डोंगर रचत सर्वांचे लक्ष वेधले. पण मनोज भालेराव, अमोल साळुंखे, गुरव यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. अधिकारी संघातर्फे संतोष कुलकर्णी, कादर शेख, इशादीन शेळकंदे, संजय धनशेट्टी, प्रसाद मिरकले यांनी जबरदस्त गोलंदाजी केली तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे क्षेत्ररक्षण लक्षवेधी ठरले. पत्रकार संघांने 69 धावांचे अधिकारी संघाला आव्हान ठेवले.
अधिकारी संघ फलंदाजी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांची पहिली जोडी मैदानात उतरली. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांची डावखुरी फलंदाजी सर्वांनाच भावली. अत्यंत संयमी पद्धतीने जंगम यांनी धावाचा डोंगर रचला. आप्पा पाटील यांच्या यांच्या गोलंदाजीवर जाधव त्रिफळाचीत झाले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मैदानात उतरले. सचिन जाधव यांच्या बॉलिंगवर कोहिनकर यांनी जोरदार फटकेबाजी करीत सर्वांचे लक्ष वेधले. एका ओव्हर मध्ये पाच फोर मारून त्यांनी इतिहास रचला. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राजकुमार सारोळे, बळीराम सर्वगोड, श्रीशैल चिंचोळकर यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. 14 बॉल राखून अधिकारी संघ विजयी झाला. अधिकारी व पत्रकार संघातील मैत्रीत्वाचा खेळीमेळीचा हा सामना उपस्थितांना खूपच भावला. याप्रसंगी क्रीडा स्पर्धेच्या संयोजन सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपस्थित होत्या. सामन्याचे समालोचन उपअभियंता मुल्ला यांनी केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेतील इतर सामन्यांना सुरुवात झाली.