
सोलापूर : माणसाचा देह नश्वर आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा शेवट आहे. जगात शेवटी फक्त आपले नावच शिल्लक राहते. त्यामुळे आयुष्यात चांगले कर्म करा, असा उपदेश ह. भ. प. अॅडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज यांनी केला.
धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे कै. शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चव्हाण परिवारातर्फे आयोजित कीर्तनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥
श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील ओवींचे विवेचन ह भ प ॲड. लोमटे यांनी अत्यंत विवेचनात्मक पद्धतीने केले. आयुष्यात सुखदुःख येतच राहतात. भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हालत नाही. ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावर गरज भासली त्या त्यावेळी भगवंतांनी सात वेळा अवतार घेतला आहे. सध्या कलियुग सुरू आहे. कलियुगात संतांचा सहवास लाभणे हेच आपले जीवन कृतार्थ करण्यासारखे आहे. कै.शिवाजीराव चव्हाण यांनी आपल्या जीवनात चांगले कर्म केल्यामुळेच आज ही सेवा घडत आहे. तुम्ही किती कमावलं याला महत्त्व नाही, तुम्ही किती माणसे कमवली हे महत्त्वाचे आहे. जाताना कोणी काही घेऊन जात नाही, त्यामुळे जीवनात चांगले कर्म करा, असे हभप लोमटे महाराज यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज (कानेगाव), एडवोकेट पी. वाय. जाधव (तुरोरी), एडवोकेट पंडितराव पाटील (मोहेकर), बलभीम जाधव, ऑडिटर राजेश शिंदे, सनातन भालकंडे (कानेगाव), सेवेकरी अमृत सुरवसे, मारुती शिंदे, सहदेव वारकड, संतोष पाटील, बप्पा महाराज (कानेगाव) व करजखेडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री चिंचोली येथील माऊली महिला मंडळाचे भजन झाले. त्याचबरोबर आठवडाभर साक्षी शिराळा येथील काशिनाथ महाराज यांचे गरुड पुराण झाले. याला हार्मोनियमची साथ उंडरगावच्या लक्ष्मण सूर्यवंशी यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम चव्हाण, गौतम चव्हाण, महादेव चव्हाण, रोहित चव्हाण, बबलू चव्हाण, बालाजी जिरगाळे, दत्ता गरड यांनी परिश्रम घेतले.