गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्यावर होणार कारवाई

सोलापूर : शिक्षक बदली प्रक्रियेत अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांच्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने झेडपी प्रशासनाला अहवाल सादर केला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी परमेश्वर अरबाळे यांनी शिक्षकांच्या परस्पर बदल्या करून विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरल्याची तक्रार मागासवर्गीय शिक्षक संघटनेने केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आरबळे यांच्या या कृत्याची चौकशी करण्यासाठी योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने तक्रारदार व प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांना चौकशीसाठी बोलावून पुराव्याची खातरजमा केली होती. चौकशी सुरू झाल्यावर गटशिक्षणाधिकारी आरबळे यांनी त्या शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या व तक्रार करणाऱ्या मैंदर्गी कन्नड मुली शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्यावर कारवाई करण्याचा गटविकास अधिकाऱ्याकडे अहवाल पाठविला. या अहवालावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने मुख्याध्यापक कट्टीमनी यांना निलंबित केले. या निलंबनाचे पडसाद उमटले असून शाळेतील विद्यार्थिनी व पालक यांनी मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्यावर सुडात्मक कारवाई झाल्याचा आरोप करीत आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान कट्टीमनी यांनी आरबळे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचा चौकशी समितीचा अहवाल द्यावा अन्यथा 20 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच बीडीओनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे दाद मागितली आहे.
दरम्यान गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचा अहवाल पंधरा दिवसापूर्वीच जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती चौकशी अधिकारी योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी दिली. जिल्हा परिषद प्रशासन गेले आठ दिवस क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होते. आता येत्या दोन दिवसात आरबळे यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या सूत्राने सांगितले.