शिवदर्शनासाठी पालखी सोहळ्याबरोबर कलेक्टर, सीपी पहिल्यांदाच झेडपी उद्यानात

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने रंगभवन चौकातील जिल्हा परिषदेचा उद्यान परिसर दुमदूमला. छत्रपती शिवाजी महाराज कि जय…जय भवानी व जय शिवाजीच्या गजरानं बुधवारी जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दुमदुमून गेले. यानिमित्ताने कलेक्टर कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राजकुमार पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या उद्यानात आले होते.
रंगभवन चौकातील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरच कलेक्टर यांचा शासकीय बंगला आहे. या बंगल्याच्या पोर्चमधून जिल्हा परिषदेच्या उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा दिसत असल्याने या बंगल्याला “शिवदर्शन’ असे नाव देण्यात आले आहे. या बंगल्यातून येता जाता कलेक्टरांना शिवदर्शन होत असल्यामुळे आतापर्यंत कोणी या उद्यानात आले नव्हते. शिवजयंती निमित्त बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे या उद्यानात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा जल व्यवस्थापन अधिकारी पारसे, मराठा सेवा संघाचे शाखाध्यक्ष अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अरूण क्षिरसागर, अधिक्षक अनिल जगताप, चंद्रकांत होळकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, पतसंस्था क्र १ चे चेअरमन डाॅ. माने, चेतन वाघमारे उपस्थित होते.
जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पालखी सोहळा उत्साहात…
छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ कुलदीप जंगम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली पालखी खांद्यावर घेतली.. संभाजी आरमारच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोङे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम.राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिंक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, हाजीमलंग नदाफ यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कलेक्टर व सीपी पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या उद्यानात आले. कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग आला.