लाडक्या बहिणींनो चिंता नको, त्याकडे अजून लक्ष देऊ नका!

सोलापूर : लाडक्या बहिणीच्या अर्जांची छाननी सुरू आहे.. नावे चार चाकी असलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार… पैसे वसूल करणार…. सध्या अशा बातम्यांचा भडीमार सुरू आहे. पण सध्या शासनाकडून जिल्हास्तरावर असे कोणतेच आदेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने अशा बातम्या वाचा आणि सोडून द्या.
विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण योजना पॉवरफुल्ल ठरली. लाडक्या बहिणीच्या जीवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे सरकार आले. नवीन सरकार आल्यानंतर अद्याप लाडक्या बहिणींचे अनुदान खात्यावर जमा झालेले नाही. योजना रद्द होणार, लाडक्या बहिणींच्या खात्याची पडताळणी करून चार चाकी नावे असणाऱ्या बहिणींचे अनुदान रद्द होणार अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या बातम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष आधीच ठरलेले आहेत. त्याच्या निर्देशानुसार या निकषांची पडताळणी केली जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बहिणींचे अनुदान रद्द होणार अशा बातम्या येत आहेत. चार चाकीचा निकष यापूर्वीचाच आहे. पण अद्याप याची पडताळणी करण्याचे जिल्हास्तरावर कोणतेच आदेश नसल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे अर्ज रद्द होण्याबाबत येणाऱ्या उलटसुलट बातम्यांमुळे लाडक्या बहिणींमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. बहिणींचा संसार वेगळा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना थेट त्यांच्या खात्यावर अनुदान मिळाल्यामुळे बहिणींच्या वैयक्तिक खर्चाच्या कामासाठी या निधीचा मोठा उपयोग झाला आहे. त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री यांच्या या योजनेवर खुश आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बहिणींचा गरीब व श्रीमंत असा भेदभाव करू नये, अशा प्रतिक्रिया अनुदान घेणाऱ्या बहिणींमधून उमटत आहेत. कॅगच्या अहवालानुसार चुकीचे व इतर योजनांबरोबर हे अनुदान घेणाऱ्यांची तपासणी होऊ शकते. पण शासन स्तरावरून अद्याप याचे आदेश पारित झालेले नाहीत.
योजना सुरू करताना लाडक्या बहिणीच्या पात्रतेचे निकष ठरलेले आहेत. चार चाकीचा नियम जुनाच आहे. याबाबत अर्ज करतानाच बहिणींकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेले आहे. अर्ज तपासणी व रद्द करण्याबाबत अद्याप शासनस्तरावरून कोणतेच आदेश आलेले नाहीत. नंतर अर्ज केलेल्या प्रस्तावांची तपासणी करून पात्र प्रस्ताव मंजूर केलेले आहेत.
प्रसाद मिरकले,
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी