February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात स्वच्छता अभियानात न्यायाधीशही झाले सहभागी

सोलापूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सोलापुरात रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात जिल्हा सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशानीही आपल्या कर्मचाऱ्यांसह सहभाग नोंदवला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी देशभर महास्वच्छता अभियान घेण्यात आले. सोलापूर शहरात राबविण्यात आलेल्या अभियानात 4 हजार 486 सदस्यांनी सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याहस्ते अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात सोलापूर शहरातील 14 मार्गावरील स्वच्छता करण्यात आली. यामध्ये जवळपास 46 किलोमीटर परिसरातील 67,450 किलो ओला कचरा तर एक लाख बत्तीस हजार किलो सुका कचरा झाडून गोळा करण्यात आला. 57 ट्रॅक्टर, आठ डंपर, सात छोटा हत्ती, 39 घंटागाड्या यांच्या साह्याने हा कचरा संकलित करण्यात आला. सकाळी नऊ वाजल्यापासून ठरलेल्या मार्गावर श्री सदस्य स्वच्छता करण्याच्या कामाला लागले. यासाठी सदस्यानी नाकाला मास्क तर हातात हँडग्लोज घालून खराटे व इतर साहित्यासह स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सेवा बजावणाऱ्या सदस्यांसाठी चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. धर्मवीर संभाजी तलावाकाठी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर उमेश देवर्षी व त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. श्री सदस्यांनी दुपारपर्यंत ठरलेल्या मार्गावरील पडलेला कचरा संकलित करून वाहनांमध्ये भरला. या मोहिमेत शहरातील 14 मार्ग चकाचक झाले. अशाच प्रकारे जिल्ह्यात पंढरपूर, अकलूज येथेही स्वच्छता अभियान पार पडले.