“या’ संस्थेच्या 4 हजार सदस्यांच्या सेवेमुळे सोलापूर होणार चकाचक
55 ट्रॅक्टर, 40 घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी राहणार कार्यरत

सोलापूर : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 मार्च रोजी सोलापूर शहरात भव्य स्वच्छता अभियान आयोजित केले आहे
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवाभावी कार्यासाठी महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये प्रसिद्ध आहे. पर्यावरणरक्षण, जलपुनर्भरण, वृक्षलागवड व संवर्धन, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीसाठी शिबिरे, स्वच्छता अभियान या उपक्रमासाठी विशेष प्रसिद्ध आहे. समाजातील सर्व मानवांसाठी बैठकीच्याद्वारे प्रबोधनाचा गेल्या 82 वर्षापासून जास्त काळाचा वारसा समृद्धपणे अविरत चालू आहे. मानवाच्या अंतरंगातील असलेली अज्ञान व अंधश्रद्धा याचे निर्मूलनाचे कार्य जसे प्रबोधनाच्या बैठकीतून चालू आहे तसेच बाह्य जगतातील परिसर स्वच्छ व आरोग्यदायी व्हावा यासाठी प्रतिष्ठांच्यामार्फत अनेक ठिकाणी सातत्याने स्वच्छता अभियान राबविली जातात. याद्वारे समाजामध्ये जनजागृती व्हावी व आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी शासन करत असलेल्या व्यवस्थेला सहकार्य व्हावे म्हणून स्वच्छता अभियान आयोजित केले जात असल्याचे सदस्यांमधून सांगण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सोलापूर शहरामध्ये दि. 2 मार्च रोजी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान प्रमुख बाजारपेठा, भाजी मंडई, प्रमुख मार्ग अशा ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित केलेले आहे. यामध्ये जवळपास 4000 श्री सदस्य सहभागी होत आहेत. प्रतिष्ठानच्यावतीने एकूण 55 पेक्षा जास्त ट्रॅक्टर व ट्रॉली या स्वच्छता अभियान मध्ये सहभागी होत आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सहभागी श्री सदस्यांना मास्क व हँडग्लोज देण्यात येतात. तसेच महापालिकेच्यावतीने ही या स्वच्छता अभियानसाठी चाळीस घंटा गाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक स्वच्छता मार्गावर महापालिकेनेही आरोग्य निरीक्षकांना नियुक्त केलेले आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचे या कार्यासाठी सहकार्य लाभत आहे.
शहरात ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे त्याचे मार्ग व त्यासाठी केलेली व्यवस्था नकाशा द्वारे सदस्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी श्री सदस्यांतर्फे मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आलेल्या सदस्य त्यांना नेमून दिलेल्या भागात ठरलेल्या वेळेत आपल्या सेवाभावी कार्याला सुरुवात करणार आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. महापालिकेतर्फेही गेल्या महिनाभरात स्वच्छता अभियानाची मोहीम घेतली गेली आहे. आता श्री सदस्यांच्या सेवेमुळे सोलापूर शहर चकाचक होणार आहे.