कॉपीमुक्त अभियानावर जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी
शिक्षण विभागाची यंत्रणा ठरतेय कुचकामी

सोलापूर : दहावी व बारावी परीक्षेच्या दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त अभियानावर शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नाराजी व्यक्त करीत अभियान कडकपणे राबवा अशा सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार व लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे कॉपी संदर्भात तक्रारी आल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महसूलचे अधिकारी परीक्षा केंद्रावर पाठवून खातरजमा केली. पंढरपूर व माळशिरस तालुक्यात दोन ठिकाणी गंभीर प्रकार आढळले आहेत. त्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी सायंकाळी सर्वच अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासंबंधी कडक उपाययोजना करण्याच्या शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षा कक्ष मोबाईलद्वारे ऑनलाईन करीत कॉपीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे. परीक्षा कक्षातील पर्यवेक्षकाकडील मोबाईलचा कॅमेरा कुठे आणि फळ्यावरची कॉपी कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परीक्षा कक्ष ऑनलाइन केल्याचा प्रयोग करणाऱ्या शिक्षण विभागाने पर्यवेक्षकांना नेट पॅक पुरवला का? हाही प्रश्न पालकांमधून उपस्थित झाला आहे. त्यामुळे किती परीक्षा वर्गावरील कॅमेरे प्रत्यक्षात सुरू असतात हाही संशोधनाचा विषय झाला आहे.
मंगळवारी गणिताचा पेपर होता. फक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी फिरतीवर होते असे सांगण्यात आले. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी कार्यालयातच बसून असल्याचे चित्र दिसून आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही शिक्षण विभागाला काहीच फरक पडला नसल्याबद्दल आता खुद्द शिक्षकांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे कॉपीमुक्त अभियानावर अत्यंत गंभीर असताना हे अभियान यशस्वी होण्यासाठी त्यांनी महसूल विभाग कामाला लावला आहे पण इकडे शिक्षण विभाग मात्र या अभियानाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना विश्वासात घेणे अभिप्रेत होते. याशिवाय दररोज होत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही कळविणे गरजेचे असताना या कार्यवाहीबाबत कसलीच प्रसिद्धी यंत्रणा राबविण्यात आल्याचे दिसत नाही. शिक्षण विभागाकडून कार्यरत असलेल्या भरारी पथकाकडून दररोजची कामगिरी प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर त्याचा दबदबा राहतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण उपसंचालक कार्यालयाकडून माहिती देऊ नये असे सांगण्यात आल्याचे जाहीर करून अधिकाऱ्यांनी हातवर केले आहेत. जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अंकुश की उपसंचालक कार्यालयाचा? असा नवीन प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे प्रशासकीय कामकाजात मोठी शिस्त आणित असून त्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. त्यांचा अभिनंदनचा ठराव विधानसभेत येण्याची शक्यता असतानाच आता कॉपी प्रकरणही गाजणार असे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे.