सोलापूर : पोलीस पाटलांची नियुक्ती होऊन १४ महिने लोटले. सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी नोटीस व स्मरणपत्र प्रांतकार्यालयाकडून देण्यात आले. या नोटीसीनंतरही जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर न केल्याने वांगीचे धरेप्पा खडाखडे आणि मनगुळीचे अश्विनी घंटे यांचे पोलीस पाटील पद रद्दचे आदेश काढत प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना सेवामुक्त केले आहे.
दक्षिण तालुक्यातील ८२ पोलीस पाटील यांची नियुक्ती ३ जानेवारी २०२३ रोजी झाली होती. नियुक्तीवेळी जातीचा दाखला ग्राह्य धरण्यात येते. या नियुक्तीनंतर सहा महिन्यात ३ जुलैपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक होते. प्रशासनाने सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या पाच पोलीस पाटलांना ३ ऑक्टोंबर २०२३ मध्ये नोटीस दिले होते. त्यामध्ये वांगीचे धरेप्पा खडाखडे, आलेगावचे राजू माळी, वडगावचे संगय्या कपाळे, मनगुळीचे अश्विनी घंटे, उळेवाडीचे सद्दाम कारभारी यांचा समावेश होता. या नोटीसीनंतर वडगावचे कपाळे आणि उळेवाडीच्या कारभारी पोलीस पाटीलांनी प्रमाणपत्र सादर केले. परंतु उर्वरित उर्वरित खडाखडे, माळी आणि घंटे या तिघांना ६ जानेवारी रोजी १५ दिवसाची दुसरी नोटीस काढण्यात आली आहे. या नोटीसीनंतर आलेगावच्या पोलीस पाटलांनी जातवैधता प्रमाणपत्राची पोहोच पावती सादर केली. तर खडाखडे आणि घंटे यांना तिसरी अंतिम नोटीस २५ जानेवारीला बजाविले. त्यानंतरही या दोन्ही पोलीस पाटलांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रांताधिकारी खडाखडे आणि घंटे यांचे पोलीस पाटील पद रद्दचे आदेश काढून त्यांना सेवामुक्त केले आहे.
सरपंचनंतर पोलीस पाटील
माजी सरपंच सीता खडाखडे यांनीही जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिन्याभरापूर्वी त्यांचे सरपंच पद रद्द केले आहे. त्यानंतर आता पोलीस पाटील धरेप्पा खडाखडे यांनीही जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पोलीस पाटील पद प्रांताधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. एकाच गावतील एकाच कुटुंबातील सरपंच पद आणि पोलीस पाटील पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरपंच पद रद्द झाल्यानंतर सुरज खडाखडे यांनी पोलीस पाटील धरेप्पा यांचे पोलीस पाटील रद्द करण्याबाबत तक्रार केली होती. त्यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे निदर्शनास आणून दिले होते. प्रमाणपत्र न दिलेल्या सर्वांचेच पद रद्द करा, अशी मागणी बचावावेळी धरेप्पा यांनी केली. त्यामुळे घंटे यांचेही पद धोक्यात आले.
जानेवारी महिन्यात तीन गावच्या पोलीस पाटलांना नोटीस दिली होती. खडाखडे आणि घंटे यांना आतापर्यंत तीनवेळा नोटीसा दिल्या. स्मरण पत्र दिले. सहा महिन्याची मुदत असताना १४ महिन्यानंतरही या पोलीस पाटलांनी जातवैधता प्रक्रियेची पोहोचही दिली नाही आणि प्रमाणपत्रही सादर केले नाही. त्यामुळे या दोघांचे दोन दिवसांपूर्वीच पद रद्दचे आदेश काढून त्यांना सेवामुक्त केले आहे.
सुमित शिंदे, प्रांताधिकारी, दक्षिण सोलापूर

More Stories
‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान
ट्रेनिंग सेंटरमध्ये बेकायदा बदली; त्या बदल्यात घर बांधून घेतले
सोलापूर मिनी मंत्रालयाची चावी महिलांच्या हाती; “सोलापूर समाचार’ चे वृत्त तंतोतंत खरे ठरणार