सोलापुरात बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करा
भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

सोलापूर : सोलापुरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता असून त्यांना शोधून काढावे आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्याकडे केली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, सोलापूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून बुधवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आढळून आले आहे. ही बनावट कागदपत्रे ताबडतोब रद्द करावीत आणि ही बनावट कागदपत्रे या बांगलादेशी घुसखोरांना कोणी तयार करून दिली याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, लोकसभा निवडणुकीप्रसंगी अशा अनेकांची नावे मतदारयादीत देखील असल्याचे आढळून आले होते. बांगलादेशी घुसखोर शहर आणि जिल्ह्यात आणखी कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या टोळ्या शोधून काढून त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले. निवेदन देताना भाजपा सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास करली, अनंत जाधव, सोमनाथ केंगनाळकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम वाकसे, अनिल कंदलगी, माजी नगरसेवक रवी कैयावाले, चिटणीस बजरंग कुलकर्णी, श्रीनिवास पुरुड, श्रीकांत घाडगे उपस्थित होते.