शाळेला पाठ दाखवलेले 23 मार्चला देणार परीक्षा
सोलापूर जिल्ह्यात तब्बल 21हजार जण हजर राहणार

सोलापूर : बारावीची परीक्षा संपली तर दहावीची परीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता प्राथमिक शाळांच्या परीक्षेची तयारी सुरू असतानाच रविवारी आणखी एक महत्त्वाची परीक्षा होणार आहे. शाळेला पाठ फिरविलेल्यांसाठी ही परीक्षा असून सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत 150 मार्काचा पेपर परीक्षार्थींना सोडवावा लागणार आहे.
असाक्षरांना साक्षर करण्यासाठी गतवर्षीपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापनासाठी असाक्षर व्यक्तींसाठी रविवार दिनांक 23 मार्च रोजी ही परीक्षा ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पाच लाख तर सोलापूर जिल्ह्यातील 21हजार 118 जण ही परीक्षा देणार आहेत. केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी राज्यात सर्व जिल्ह्यात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही परीक्षा होणार आहे. असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्याचे केंद्रस्तरावर नियोजन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात उल्हास ऍपवर नोंदणी झालेल्या व ज्यांनी ज्या शाळेतून अशी नोंदणी केली आहे तसेच ज्यांनी यापूर्वी 17 मार्च 2024 रोजी अशी परीक्षा दिली होती, अशा सर्वांना पुन्हा एकदा ही परीक्षा देता येणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा होणार आहे. परिक्षेला बसू इच्छिणाऱ्या असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर आणण्यासाठी मुख्याध्यापक शाळेचे शिक्षक केंद्रप्रमुख ग्रामस्थ कार्यकर्ते स्वयंसेवक यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी केले आहे.
दीडशे मार्कांची परीक्षा…
असाक्षर व्यक्ती, मुलगा, मुलगी, तरुण, वयस्कर यांनी साक्षरतेचा जो अभ्यास केला त्यावरून दीडशे मार्कांची ही परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये 50 मार्क लेखन, 50 मार्क संख्याज्ञान आणि 50 मार्क वाचनासाठी आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी 17 गुणांची आवश्यकता आहे. ही परीक्षा दिल्यानंतर असा असाक्षरांना साक्षर म्हणून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे, असेही सुलभा वठारे यांनी सांगितले.