गुरुजीनो टेन्शन सोडा, तुमचंही होणार प्रमोशन
सीईओ कुलदीप जंगम यांनी दिले 196 कर्मचाऱ्यांना सरप्राईज

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 196 कर्मचाऱ्यांना सरप्राईज देत प्रमोशन दिले आहे. प्रमोशनवरून नियुक्ती देतानाही पसंतीच्या ठिकाणाला प्राधान्य दिल्यामुळे झेडपीच्या कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार घेतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी कर्मचाऱ्यांना एक सुखद धक्का दिला आहे. अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्या त्यांनी दिल्या. शिपाई पदावरील कर्मचारी लिपिक झाल्यामुळे शिपाई पदावरील कर्मचारी लिपिक झाल्यामुळे व त्यांना इच्छितस्थळी नियुक्ती मिळाल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयातही आनंद व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासन, बांधकाम, आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाले आहे. आता फक्त शिक्षण विभाग राहिला आहे. परीक्षांमुळे शिक्षकांचे प्रमोशन मागे ठेवले आहे. दहावीची परीक्षा संपली की लगेचच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या पदोन्नत्या जाहीर केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बुधवारी दिली. दहावी, बारावी परीक्षा, मार्च केअर आणि अशात बजेटची तयारी यामुळे दररोजचे शेड्युल बिझी आहे. यंदा बजेट दहा कोटीने कमी झाले आहे. त्यात नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यासाठी अभ्यास सुरू आहे. त्यानंतर दुर्लक्षित असलेल्या विभागावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे जंगम यांनी सांगितले.
अनुकंपाची भरती लवकरच…
प्रमोशन झाल्यानंतर अनुकंपाची ही भरती लवकरच घेतली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बऱ्याच विभागातील रिक्त पदांवर कर्मचारी मिळणार आहेत. जिल्हा परिषदेच्या विकास कामांना गती आणण्यासाठी हा प्रयत्न राहणार आहे. पदोन्नती बरोबरच सरळ सेवेतून रिक्त झालेल्या जागांवर ही नियुक्ती देण्यात आली आहे. या सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शकपणे पार पाडण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये आनंद…
सीईओ कुलदीप जंगम यांनी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या पदोन्नत्या पारदर्शकपणे पार पडल्याबद्दल कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामध्ये कास्ट्राईब संघटनेचे अरुणभाऊ क्षीरसागर, कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे, मराठा सेवा संघ शाखेचे अविनाश गोडसे यांचा समावेश आहे.