
सोलापूर : मुंबई येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सदस्यता महाअभियान 2025 संघटन पर्व कार्यशाळेत महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती संजय कोळी यांची सोलापूर शहर संघटन पर्व निवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबई सोमवारी झालेल्या कार्यशाळेत भाजपचे कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, केंद्रीय निवडणूक प्रमुख शिवप्रकाश, राजेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला सोलापूर शहर भाजपचे अध्यक्ष नरेन्द्र काळे, सरचिटणीस पांडुरंग दिंडी उपस्थित होते. या कार्यशाळेत कोळी यांची सोलापूर शहर संघटन पर्व निवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपच्या शहराध्यक्ष नरेंद्र काळे आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक किरण देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. माजी नगरसेविका सुलोचना कोळी यांचे चिरंजीव म्हणून संजय कोळी यांची संपूर्ण सोलापूर शहराला ओळख आहे. आईनंतर नगरसेवक म्हणून ते महापालिकेवर तीन वेळा निवडून गेले. पहिल्यांदा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार कै. लिंगराज वल्लाळ यांनी त्यांना नगरसेवक पदासाठी शिफारस केली. त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनीही त्यांची शिफारस केली. स्थायी समितीचे सभापती व सभागृहनेता अशी त्यांना महापालिकेत नेतृत्व करायला संधी मिळाली. सन 2007 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, त्यानंतर दोन वेळा शहर उत्तर निवडणूक प्रमुख म्हणून व 2019 मध्ये लोकसभा शहर उत्तर निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. आमदार विजयकुमार देशमुख यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक असणारे कोळी तरुण वर्गामध्ये लोकप्रिय आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात त्यांचे मंडळ मिरवणूक, लेझिम पथक व सामाजिक कार्यात अग्रस्थानी असते. कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांनी गरिबांना अन्नदान व औषध उपचाराची व्यवस्था केली. भाजपच्या संघटनासाठी त्यांनी अहोरात्र एकनिष्ठेने काम केल्यामुळे पक्ष वाढीसाठी त्यांना वेळोवेळी जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभागात भाजपला मतदान नेहमीच आघाडीवर राहिले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन कोळी यांच्यावर आता ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांच्यावर सोलापूरच्या तिन्ही मतदारसंघाची मोठी जबाबदारी राहणार आहे.