सोलापुरात प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपवर अत्याधुनिक बसपोर्ट उभारणार
आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतला पुढाकार

सोलापूर : सोलापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाबत बुधवार दि.१९ मार्च रोजी विधानभवन येथे परिवहन मंत्र्याच्या दालनात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने बैठक होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापुरात प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप आधारावर अत्याधुनिक बस्पोर्ट उभारणी बाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकित आ. विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी श्रीक्षेत्र तुळजापुर, गाणगापुर, पंढरपुर व अक्कलकोट या तिर्थस्थळास जाण्यासाठी लाखो भाविक येत असतात.यामुळे प्रत्येक दिवशी एक हजार बसची ये-जा असते. त्यामुळे या बस स्थानकावर दररोज येणारे प्रवाशी व इतर वर्दळ लक्षात घेता प्रवाशांसाठी आणखी एक बस स्थानक सोलापुरात उभारणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
सोलापूर बसस्थानकाकरीता सध्या उपलब्ध असलेल्या जागेचा भाडेकरार कालावधी पुढील प्रमाणे आहे. सोलापूर बसस्थानकाची जागा पांजरापोळ या संस्थेकडुन ९९ वर्षाच्या कराराने घेण्यात आली आहे. या कराराची मुदत १ सप्टेंबर १९४९ ते दि. ३१डिसेंबर २०४८ पर्यंत आहे. बसस्थानकाचे बांधीव व वाहनतळाचे क्षेत्रफळ : बसस्थानकाचे एकूण क्षेत्रफळ ६२४८.५५ चौ.मी. असुन त्यामध्ये बांधीव क्षेत्रफळ २५०० चौ.मी. इतके असुन ३७४८.५५ इतकी जागा बसपार्किंगकरीता वापरण्यात येते.बसस्थानकाचे बांधकाम वर्ष : बसस्थानकाचे बांधकाम हे सन १९६४ साली आर. सी. सी. स्वरुपाचे बांधण्यात आलेले असुन जुने व जीर्ण झालेले आहे.
बसस्थानकावरील एकूण फलाट संख्या : ३६ ची गरज असतांना बसस्थानकामध्ये प्रवाशी प्रतिक्षालयासहित प्रवाशांकरीता एकूण २३ फलाट उपलब्ध असुन त्यामध्ये मराठवाडा विभागाकरीता १३ फलाट उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना बस कुठे थांबली आहे ते समजत नाही. या कारणाने प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानकामध्ये स्थानक प्रमुख कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष, चालक/वाहक विश्रांती कक्ष नाही. हिरकणी कक्ष, व इतर आस्थापनांमध्ये उपहारगृह, जनऔषधी केंद्र, जनरल स्टोअर्स,बुकस्टॉल, बेकरी स्टॉल, कोल्डड्रिंक सेंटर, चहा कॅन्टीन, स्नॅक सेंटर आदि सुविधा होणे गरजेचे आहे.
बसस्थानकात सद्या बसस्थानकावरील बस आत येणा-या मार्गाशेजारी प्रसाधनगृह बांधले असून.सदर प्रसाधनगृहाची दुरावस्था झालेली आहे. याची देखभाल जिजामाता म. ग्रा.संस्था सोलापूर यांच्यामार्फत चालविली जात आहे. त्यामुळे या बैठकीत अत्याधुनिक बसपोर्ट बांधण्याची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली. यावर परिवहन मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. सर्वंकष चर्चा झाल्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर ९९ वर्ष करार करुन आधुनिक बसस्थानक बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी एसटी महामंडाळाचे वरीष्ट अधिकारी व माजी नगरसेवक संजय कोळी, उद्योगपती प्रमोद मोरे उपस्थित होते.