May 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट

सोलापूर :  सोलापूरकरांची तब्बल साठ वर्षांची प्रतीक्षा संपत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंगळवारी सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट दिली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याकामी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची त्यांना खंबीर साथ मिळाली आहे.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूरचे पालकमंत्री असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्याकडे सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सोलापूरकरांना अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा शब्द दिला होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हा विषय रखडला होता. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रावर सही घेऊन पाठपुरावा सुरू केला होता. तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याबाबतची मागणी लावून धरली होती. विधानसभेत तीन – चार वेळा याबाबत राज्य शासनाकडे मागणी केली होती. याकामी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना खंबीर साथ देत राज्य शासनाकडे वारंवार ही मागणी केली होती. मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबत निवेदन केल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील हालचाली वेगाने झाल्या आणि मंगळवारी याबाबतचा मंत्रिमंडळ निर्णय झाला.

१९६६ साली सोलापूर साठी मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला नेण्यात आले. सोलापूरकरांनी अनेक दशके हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापुरातून सुरू व्हावे यासाठी प्रतीक्षा केली. परंतु इच्छाशक्तीच्या अभावी हे महाविद्यालय सोलापुरात सुरू होऊ शकले नाही. कामगारांचे शहर असलेल्या सोलापुरात श्रमिकांच्या मुलांना शासनाच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाची सोय होती. परंतु अभियांत्रिकी शिक्षण मिळण्यास अडचण होती. अभियांत्रिकी शिक्षणासाठी वारेमाप खर्च करून मुलांना परगावी पाठवावे लागत होते. अनेक मुलांना पैशांअभावी शिक्षण सोडण्याचीही वेळ येत होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अभियांत्रिकीचे दर्जेदार शिक्षण घेऊन अनेक अभियंते सोलापुरात तयार होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेले तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम बंद न करता त्याच जागेत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिलेल्या या भेटीमुळे गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या अनेक पिढ्यांचे कल्याण करणारा हा निर्णय ठरणार आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालक वर्गातून उमटत आहे.

या अभ्यासक्रमांना मिळाली मंजुरी

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एआय अँड मशीन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा तीन नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे.

 

सोलापूर हे गोरगरीब, कामगार कष्टकऱ्यांचे शहर आहे. या शहरातील नव्या पिढीला तंत्रशिक्षण अभियांत्रिकी आणि नवीन ज्ञानाची भूक आहे परंतु बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अनेक तरुणांना अभियंता होण्याच्या स्वप्नांना मुरड घालून अभियांत्रिकीच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. ही गरज ओळखून सोलापुरातच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आणण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मोलाची साथ लाभली. सोलापूरच्या प्रगतीसाठी सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार.

— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य