March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळाबाबत मोठी मागणी आली पुढे

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप व कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत शिक्षक संघटना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनेक तक्रारी मांडल्या आहेत. लहरीपणाबाबत प्रसिद्ध झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याबरोबर माध्यमिकमधील सर्वच कर्मचारी बदलावेत, अशी मागणीला आता जोर धरला आहे.

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असलेला गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या लहरीपणामुळे त्रस्त झालेल्या अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कैफियत मांडल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या व कार्यालयीन कामकाजात सुधारणा होण्यासाठी या कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना बदलण्यात यावे अशी मागणी पुढे आली आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत माहिती जाणून घेतल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी एकही उपलब्ध नाही. अधीक्षक शिखरे यांची बदली झाल्यानंतर वर्ग 2 चा अधिकारी माध्यमिक शिक्षण विभागाला मिळालाच नाही. त्यामुळे लिपिकांची जबाबदारी सांभाळणारे देशमुख यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कर्मचारी उपलब्ध केले जातात. माध्यमिकला कारभार करण्यासाठी अनेक कर्मचारी उत्सुक असल्याचे दिसून आले पण माध्यमिक चा कारभार कोणत्या कर्मचाऱ्याला किती दिवस अतिरिक्त द्यायचा हे अद्याप निश्चित न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी झाल्याचे दिसून येत आहे.

या कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक राजू शेख हे गेल्या 17 वर्षापासून मेडिकल बिलाचे टेबल सांभाळत असल्याचे सांगण्यात आले. श्रीकांत धोत्रे हेही गेली तीन टर्म माध्यमिकमध्ये ठाण मांडून आहेत. अनिल पाटील हे जवळपास दोन टर्म माध्यमिक शिक्षण विभागात होते. मध्यंतरी त्यांची ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला बदली झाली. या विभागात झालेल्या टेंडर घोटाळ्यात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांना निलंबितही केले होते. या काळात त्यांची उत्तर सोलापूरला बदली झाली होती. पण माध्यमाने पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे निदर्शनाला आणून दिल्यावर पाटील यांना पुनर्स्थापित करण्यात आले. पुनर स्थापित होताना पाटील यांनी पुन्हा माध्यमिक मिळवण्यात यश मिळवले. रेवे पुन्हा तिसऱ्यांदा माध्यमिकमध्ये आले आहेत. कोरे वर्षापूर्वी माध्यमिक मध्ये नियुक्त झाले आहेत पण त्यांच्या कार्याचा म्हणावा तसा ठसा दिसून आलेला नाही. अजित देशमुख यांची एक टर्म पूर्ण झाल्यामुळे त्यांची सांगोल्याला बदली झाली आहे. बदलीमुळे ते रिलीव्ह झाले खरे पण बदलीच्या ठिकाणी हजर झालेच नाहीत. झेडपी प्रशासनाच्या आदेशाला त्यांनी कोलदांडा लावल्याचे दिसून आले आहे.

खाजगी शाळांमधील लिपिक 

जिल्हा परिषदेचे कर्मचारी कमी पडले म्हणून की काय खाजगी शाळांमधील लिपिक ही माध्यमिक मध्ये परस्पर घेण्यात आले आहेत. बार्शी तालुक्यातील खाजगी शाळेत काम करणारे लिपिक आवटे हे माध्यमिकमध्ये कसे आले हे कोणालाच कळले नाही. त्याचबरोबर फिरोज शेख, राजगुरु,साबळे हे तीन लिपिकही गेल्या अनेक वर्षापासून माध्यमिक मध्ये कार्यरत आहेत. खाजगी शाळांमधून काम करणाऱ्या या लिपीकाकडून काही घोटाळा झाल्यास याला कोण जबाबदार? असा सवाल उपस्थित होत आहे.

कर्मचाऱ्यांना आशीर्वाद देणारा “तो’ कोण?

माध्यमिक मध्ये ठाण मांडून बसलेल्या या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आशीर्वाद आहे अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. “तो’ कर्मचारी कोण? याचा शोध घेणे सीईओ कुलदीप जंगम यांना महत्त्वाचे ठरणार आहे. सीईओ जंगम यांनी माध्यमिकचे मोठे ऑपरेशन करण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये या गंभीर बाबींचा समावेश झाला तर माध्यमिकचा कारभार आणखी सुकर होणार आहे, अशी शिक्षकांमध्ये चर्चा आहे.

माध्यमिकची झाली बदनामी 

माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असलेल्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे. अशातच लास्ट प्रतिबंधक विभागाने लिपिक मस्के यांच्यावर कारवाई केली आहे. अजूनही काही कर्मचारी रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बरेच जण कार्यालयातून गायब असतात, अशीही चर्चा ऐकायला मिळाली.

जगताप यांची बदली करा 

माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार शिक्षण अधिकारी जगताप यांची बदली केल्याशिवाय सुधारणार नाही अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून आयुक्तांकडे अहवाल सादर करावा अशी मागणी होत आहे. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी ते सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यात माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असलेल्या गोंधळाची त्यांनी दखल घेत शिक्षण अधिकारी जगताप यांच्यावर कारवाईची शिफारस करावी अशी मागणी होत आहे. पालकमंत्री गोरे हे शिक्षकांच्या या प्रश्नांकडे कोणत्या भूमिकेकडून पाहतात हे पाहावे लागणार आहे.