सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

ऊन उतरल्यावर शिक्षणाधिकारी आले अनं रात्री उशिरापर्यंत केले कामकाज

वाट पाहून शिक्षक गेले घरी, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्या तक्रारी

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कारभाराचे अनेक किस्से समोर येत आहेत. मार्चअखेर, तीन दिवस सुट्टी असा कामाचा ताण आणि मंगळवारी कामकाजचा दिवस असताना शिक्षणाधिकारी जगताप चक्क पाच वाजता कार्यालयात आले आणि रात्री आठ वाजेपर्यंत त्यांनी कामकाज उरकले असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरुद्ध तक्रारी वाढल्या आहेत. मनाला वाटेल तसे ते कामकाज करीत असल्याचा आरोप शिक्षकांमधून होत आहे. याची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी घेतली. त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाची बैठक घेऊन शिक्षणाधिकारी जगताप यांना पंधरा दिवसात कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असतानाही अजून कामकाजात सुधारणा झाल्याचे कुठलीच लक्षणे दिसत नसल्याचे दिसून आले आहे. तीन दिवसाच्या सुट्टीनंतर मंगळवारी शिक्षणाधिकारी जगताप यांची भेट होईल म्हणून अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक शिक्षण विभागात आले होते. पण दिवसभर शिक्षणाधिकारी जगताप कार्यालयाकडे फिरकले नाही. उन्हाचा कडाका व अंगाची लाही लाही होत असल्यामुळे अनेक शिक्षक जिल्हा परिषदेच्या बागेत शिक्षणाधिकाऱ्याची प्रतीक्षा करीत बसलेले दिसून आले. शिक्षणाधिकारी आज येणार आहेत काय? असा सवाल कर्मचाऱ्यांना केल्यानंतर कोणीही ते केव्हा येतील याबाबत स्पष्टपणे सांगू शकले नाहीत. वाट पाहून शिक्षणाधिकारी आज येणार नाहीत असे समजून बरेच शिक्षक आल्या पावली परतले. पण शिक्षणाधिकारी जगताप यांची सायंकाळी पाचनंतर कार्यालयात एन्ट्री झाली. ज्यांच्या नशिबाने त्यांना शिक्षणाधिकाऱ्याच्या दर्शनाचा लाभ झाला त्या शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना उन्हाचा त्रास होत असावा अशा प्रतिक्रिया दिल्या. गर्दीमुळे व शिक्षकांच्या तक्रारीमुळे कामकाजात त्रास होत असल्यामुळे त्यांनी अशी वेळ निवडली असावी अशीही चर्चा ऐकावयास मिळाली.

मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्या तक्रारी….

मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची मंगळवारी सायंकाळी यांची भेट घेतली. बऱ्याच शिक्षकांच्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचल्या आहेत. या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत  मनस्ताप व्यक्त केल्याचे चिवटे यांनी सांगितले. लवकरात लवकर शिक्षकांच्या अडचणी मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांचे ऑफिसपर्यंत कोणताच शिक्षक येऊ नये याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी शिक्षणाधिकारी जगताप यांना सुनावले. यावेळी सेनेचे जिल्हा जिल्हाप्रमुख मनीष काळजे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे बापूसाहेब अडसूळ, सोलापूर वैद्यकीय मदत कक्षाचे सुरज जम्मा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button