April 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

“या’ कारणातून येवती येथे पती-पत्नीवर झाला गोळीबार

सोलापूर : शेतीच्या वादातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील येवती येथे मंगळवारी दुपारी बारा वाजता येवती- रोपळे मार्गावर घडली.

शिवाजी जाधव व सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. या दोघांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणारा दशरथ गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना तपासाबाबत  सूचना दिल्या.पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली घटनेची माहिती दिली.शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर दशरथ गायकवाड याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दोघेही जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार ठिकाणी रस्त्यावर जिवंत काडतुसे व दोन मॅक्झिन पोलिसांना मिळून आल्या.घटनास्थळावर ठसे तज्ञांना पाचारण केले होते. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी हजर होते. शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज असून घटना मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने मोहोळ पोलीस ठाण्याकडे गुन्हा नोंद करून तपास देण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तयब मुजावर यांनी दिली.