सोलापूर : मार्चअखेर असताना वेळेत बिले सादर न केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या इतर देयकापोटी शासनाकडून आलेले दीड कोटी परत गेल्याप्रकरणी अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारीत वाढ झाली आहे. मार्चअखेर असताना तालुक्यातील शिक्षकांच्या थकीत वेतन व इतर देयकापोटी आलेले सुमारे दीड कोटी रुपये परत गेले आहेत. याबाबत संबंधित शिक्षकांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे धाव घेत शिक्षण विभागाच्या कारभाराचा पाढा वाचला आहे. त्यामुळे आमदार कल्याणशेट्टी यांनी याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना संपर्क साधून संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा व ज्यांच्यामुळे या चुका झाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहेत. प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकांतील मुलीना शाळेच्या प्रवाहात आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिदिन एक रुपये प्रमाणे वर्षभरात जास्तीत जास्त 220 रु देण्यात येणारा उपस्थिती भत्ता दिलेला नाही. सन 2022-23 आाणि 2023-24 व्या वर्षातील दारिद्रयरेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता वाटपासाठी अनुक्रमे 2 लाख 70 हजार 600 रु आणि 1 लाख 48 हजार 716 रुपये इतका निधी प्राप्त होवूनही वितरणास दुर्लक्ष झाले आहे.”बेटी बचाव-बेटी पढाव” शासनाचे धोरण असून मुलींच्या शिक्षणासाठी शासन सातत्याने विविध उपक्रम, योजना, आर्थिक मदत याद्वारे मदत करत असताना अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभाग मात्र याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत आहे. थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfar) हे शासनाने धोरण अवलंबिलेले असतानाही वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी आरबळे यांच्याकडून सन 2022-23 चा निधी मुख्याध्यापक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. परंतु त्यातील मोठ्या प्रमाणात खाती बंद अमल्याने सदर निधी विद्यार्थीनीना प्राप्त झाला नाही. तसेच सन 2023-24 चा निधी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे परत गेला. सन 2014-15 या आर्थिक वर्षात पुरवणी तसेच थकित देयकासाठी संचालक कार्यालयाकडून 59 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता. या निधीतून शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे थकलेले हप्ते, महागाई फरक प्राधान्यक्रमाने अदा करावेत असे न्यायालयाने आदेश दिल्याने जिल्हा परिषर शिक्षण विभागाने तश्या सूचना दिलेल्या होत्या. तसेच चट्टोपाध्याय वेतनग्रणी फरक, आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांचे थकित वेतन, विज्ञान वेतनश्रेणी प्राप्त शिक्षकाचे देयक, सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते भरणा करणे आवश्यक होते.परंतु प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्यामुळे अक्कलकोट तालुका वगळता जिल्हयातील अन्य तालुक्यातील शिक्षकांचे देयके अदा करण्यात आली आहेत. सोलापूर जिल्हयातील 10 तालुक्यातील 6 कोटी 21 लाख 49 हजार 432 रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला. परंतु अक्कलकोट तालुक्यातील 1 ते 1.5 कोटींचा निधी प्राध्यामिक शिक्षकांना मिळला नाही. याबाबत कारणे दाखवा नोटीस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अरबाळे यांना बजावली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली जाईल, असाही नोटीशीत इशारा देण्यात आला आहे.


More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ