सोलापूर जिल्ह्याचा टक्का घसरला ; कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम

Rajkumar Sarole
2 Min Read

सोलापूर : बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकालाचा टक्का घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रभावीपणे राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा हा परिणाम असून, यात विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा हेतू नसून अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढावी यासाठी असे प्रयत्न होत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.६२ टक्के लागला आहे. गतवर्षी हाच निकाल ९३. ८२ टक्के इतका होता यंदा निकालाची टक्केवारी ५.२६ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात यंदा बारावी व दहावी परीक्षेच्यावेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. परीक्षा वर्ग कक्ष मोबाईल द्वारे नियंत्रण कक्षाकडे लाईव्ह करण्यात आला होता. परीक्षा कक्षावर मोबाईल कॅमेराची नजर असल्याने कॉपीमुक्त अभियानाचा चांगलाच प्रभाव दिसून आला. शहरी व  ग्रामीण भागातील काही केंद्रावर कॉपी चालत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे अशा संवेदनशील केंद्रावर बैठे व  फिरते पथकांची नजर ठेवण्यात आली होती. तरीही कॉपीचे 37 प्रकार उघडकीला आले होते. कॉपीमुक्त अभियानामुळे सर्वच परीक्षा केंद्रावर कडक लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे  व परीक्षकांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे अभियानाचा प्रभाव दिसून आला. यामुळे निकालाच्या टक्केवारीत फरक दिसून येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर द्यावा हेच या अभियानाचे उद्दिष्ट आहे, असे शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. या परीक्षेला 30 हजार 547 मुले तर 24 हजार 321 मुली असे एकूण 54 हजार 875 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील प्रत्यक्षात 30 हजार 293 मुले 24 हजार 60 मुली अशा 54 हजार 353 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यातील 25 हजार 641 मुले व 22 हजार 527 मुली असे एकूण 48 हजार 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *