सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी पाऊस झालेला नाही. दहा दिवसानंतर प्रथमच ऊन पडले असून जोरदार वारे वाहू लागले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर वाफसा येईल आणि त्यानंतर खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ उडणार आहे. पेरणीसाठी दुकानातून महागडे बियाणासाठी शेतकऱ्यांनी धावपळ करू नये. घरीच असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा मे महिन्यातच दमदार पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरण्या 15 जूननंतर केल्या जातात. पण यंदा अवेळी पावसाने आधीच हजेरी लावली. या पावसाबरोबर मान्सूनचेही आगमन झाल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लगेच पेरण्या करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील पावसाचा तडाखा पाहता खरिपाच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे कृषी अधिकारी भोसले यांनी नमूद केले आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणी करताना शेतीची आधी मशागत करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. गेल्या तीन वर्षात सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र बदललेले आहे. रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. यंदाही पाऊस चांगला झाल्यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशी करा बियाणाची निवड…
शेतकरी अधिकचे उत्पन्न मिळवण्यासाठी विविध कंपन्यांनी पॅकबंद पिशवीमध्ये प्रमाणित केलेले बियाणे पेरणीसाठी मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दरवर्षी खरीप हंगाम सुरू झाला की बियाणाच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी पडते. बियाणाची टंचाई असल्याचाही चर्चा सुरू होतात. मात्र शेतकऱ्यांनी बियाणे निवडताना स्वतःच काळजी घ्यावी असा सल्ला कृषी अधिकारी भोसले यांनी दिला आहे. पिशवीतील वापरलेले प्रमाणित बियाणावरून उत्पादन घेतल्यानंतर पुढे तीन वर्षे हे धान्य बियाणे म्हणून वापरता येते. शेतकऱ्यांकडे असे घरात शिल्लक असलेले धान्य बियाणासाठी वापरता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः घरीच चाचणी केल्यास याचा मोठा फायदा होणार आहे. शेतामध्ये जे पीक पेरावयाचे आहे त्याचे घरातील बियाणे निवडून त्यातील 100 धान्य एका प्लेटमध्ये उगवण क्षमता तपासण्यासाठी पेरावे. 100 पैकी किती धान्य उगवले यावरून धान्याची उगवण क्षमता कळू शकते. त्यातून पेरणी यंत्रातून किती धान्य सोडायचे याचा अंदाज शेतकरी बंधू बांधू शकतात. बियाणाबाबत शंका आल्यास थोडे दाट पेरणी करावी. तूर, सोयाबीन, उडीद पेरणीसाठी आधुनिक पेरणी तंत्राचा वापर करावा. यासाठी कृषी विभागाने प्रत्येक पिकाचे पेरणी तंत्राच्या पंचसूत्रीची माहिती जाहीर केली आहे. क्यू आर कोड द्वारे शेतकरी बांधव सहजपणे ही माहिती स्वतःच्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही धावपळ न करता आधुनिक पद्धतीने खरिपाची पेरणी करावी असे आव्हान त्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पावसाची अशी स्थिती
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 233 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे सगळ्यात जास्त पाऊस माळशिरस तालुक्यात तर सर्वात कमी पंढरपूर तालुक्यात झाला आहे. माळशिरसमध्ये 290, अक्कलकोट 209, मोहोळ 211, पंढरपूर 155, दक्षिण सोलापूर 122 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर खरिपाची पेरणी करता येणे शक्य आहे. गतवर्षी चार लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती पण यंदा चांगल्या पावसामुळे ही पेरणी पाच लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रावर होण्याचा कृषी विभागाने अंदाज बांधला आहे. गतवर्षी सोयाबीनचा दर खाली आल्यामुळे यंदा शेतकरी पुन्हा उडीदाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी एक लाख 40 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. तूर पेरणीलाही शेतकऱ्यांची चांगली पसंती आहे. अवेळी पावसाचा फटका जिल्ह्यातील ३७oo हेक्टरवरील केळी आंबा व भाजीपाला पिकांना बसला आहे.

More Stories
सिईओ कुशल जैन यांचे झेडपीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
पहाटे तीन पर्यंत चालली बैठक तरी सकाळी झेडपीत राडाच रे बाबा
सोलापूर झेडपी सीईओवर पुन्हा अन्याय… तुम्हाला काय वाटते?