March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आहेरवाडीत पाच वर्षापासून अडवलेला शेतीचा रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला

सोलापूर : महामार्गात गेलेल्या शेतीसाठी मोठी नुकसान भरपाई मिळत असल्याने अलीकडच्या काळात शेतीरस्ते आडविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी शिवारात गेल्या पाच वर्षापासून अडवण्यात आलेला शिवार रस्ता तहसीलदार किरण जमदाडे यांच्या आदेशान्वये शुक्रवारी खुला करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

गाव नकाशामध्ये आहेरवाडी डांबरीरस्ता ते सिंदखेड रस्ता या दरम्यान शेतरस्ता नोंद आहे. असे असताना पाच वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने हा रस्ता बंद केला. त्यामुळे पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. याबाबत राजशेखर फुंडिफल्ले (रा. आहेरवाडी) यांनी तहसीलदारांकडे वहिवाट रस्ता खुला करण्याबाबत अर्ज केला.

हा रस्ता बंद झाल्यामुळे फुंडिफल्ले यांच्यासह  सोमनाथ बिराजदार, गौराबाई बिराजदार, विजय बिराजदार, शिलसिद्ध बिराजदार, राघवेंद्र बिराजदार यांची आपल्या शेताला जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. तहसीलदार जमदाडे यांनी या तक्रारीची दखल घेत तो रस्ता खुला करण्याचा आदेश मंडल अधिकारी यांना दिला. हा रस्ता खुला करण्यासाठी वळसंग पोलिसांनी बंदोबस्तही द्यावा, असे आदेशात नमूद केले. या आदेशानुसार मंडल अधिकारी रियाज भाईजान, तलाठी विठ्ठल शिंदे व वळसंग पोलीस ठाण्यातील होटगी बीटचे सहाय्यक फौजदार राजेश निंबाळे यांच्या टीमने शुक्रवारी आहेरवाडी शिवारात जाऊन तो रस्ता खुला केला. पोलीस बंदोबस्तात गाव रस्त्यावर झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी जेसीबी चालल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी अशाप्रकारे रस्ते अडविल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत आहे. महसूल खात्याने तात्काळ याची दखल घेऊन अशाप्रकारे आदेश दिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत. तहसीलदार जमदाडे यांच्या समयसुचकतेबाबत शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.