March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपीत येणाऱ्यांना मिळणार स्वस्तात खाद्यपदार्थ

सोलापूर : सोलापूर झेडपीचा लुक बदलला आहे. आता सोलापूर झेडपीत ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी व कर्मचाऱ्यांना स्वस्ताचे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. महिला बचतगटाची ही नवी सेवा लोकांच्या पसंतीला उतरणार आहे.

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेत कामाच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील लोकांची मोठी गर्दी असते. याशिवाय जिल्हा परिषदेला लागून आंदोलन गेट, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खरेदी विक्री कार्यालय असल्याने दररोज लोकांची मोठी गर्दी असते. या परिसरात कामासाठी येणाऱ्या लोकांना भूक भागविण्यासाठी एकमेव पीपल्स हे कॅन्टीन आहे. स्वातंत्र्य सैनिक वि.म. टिमके यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने कॅन्टीनसाठी ही जागा त्याकाळी उपलब्ध केली आहे. पीपल्स कॅन्टीनच्या माध्यमातून टिमके यांची तिसरी पिढी सेवा देत आहे. हे कॅन्टीन जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अख्यत्यारीत आहे. काळाच्या ओघात महागाईमुळे या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचे दर वाढत गेले पण या कॅन्टीनने गुणवत्ता सांभाळली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्यामागे शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण हे विभाग असल्याने या कार्यालयातील कर्मचारी व येथे येणाऱ्या लोकांसाठी एक कॅन्टीन असावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत होती.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या आवाराचे सुशोभीकरण करण्याचा विचार करताना कॅन्टीनबाबतही प्राधान्याने निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेत शेड उभारून कॅन्टीन सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे यांनी यावर काम करून कॅन्टीनच्या शेडची उभारणी केली आहे. यादरम्यान कुलदीप जंगम यांनी पदभार घेतला. त्यांनी या कॅन्टीनचे व्यवस्थापन महिला बचत गटाकडे देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्ह्यात खाद्यपदार्थांमध्ये सेवा देणाऱ्या टॉपर महिला बचत गटाची माहिती घेतली. संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी तीन महिला बचत गटाबाबत झेडपीला माहिती कळवली आहे. यातून टेंभुर्णीच्या महिला बचत गटाकडे या नवीन कॅन्टीनचे व्यवस्थापन गेल्याचे सांगण्यात आले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून हे कॅन्टीन चालवून जिल्हा परिषद कर्मचारी व येथे येणाऱ्या लोकांना स्वस्त आणि मस्त खाद्यपदार्थ उपलब्ध करण्याची सोय करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांना या नवीन कॅन्टीनच्या माध्यमातून नवीन खाद्यपदार्थांची चव स्वस्तात चाखायला मिळणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते जिल्हा परिषदेतील परिसर सुशोभीकरण, सभागृह नूतनीकरणाबरोबर या कॅन्टीनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने उभा केलेल्या मॉडेल घरकुलजवळ एका बचत गटाला कॅन्टीन चालवण्यास दिले आहे. या बचत गटाने उत्कृष्टपणे हे कॅन्टीन चालवले आहे. या ठिकाणी स्वस्तात मिळणारे राईस प्लेट व भजी लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता झेडपीच्या मुख्य इमारतीवर सुरू होणाऱ्या कॅन्टीनचे आकर्षण काय राहणार? याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

बचत गटाचा मॉल…

जिल्ह्यातील महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालांना चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी नेहरू वसतिगृहातील पोस्ट कार्यालयाच्या जागेत मॉलची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना घोंगडी, खेळणी मसाल्याचे पदार्थ, पापड अशा गोष्टी स्वस्तात व सहजपणे खरेदी करता येणे शक्य होणार आहे.