सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य व ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्यानंतर मुख्यालयात पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बार आज ( सोमवार, दि. 2 जून ) फुटणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार पाच वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या आरोग्य व ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 व 31 मे रोजी करण्यात आल्या. या बदल्या करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कोणताही मुलाहीजा न बाळगता कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदल्या झालेल्या कर्मचारी आज नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणार आहेत. आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पाच वर्षापासून अधिक काळ ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. त्यामुळे विविध विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना आता बाहेर जावे लागणार आहे. अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार अशी गेल्या पंधरा दिवसापासून चर्चा आहे. प्रशासन विभागाने अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केल्यापासून अनेकांना याची धाकधूक लागली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या कडक भूमिकेमुळे कोणत्याही आडेविडे न घेता कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी आता जावे लागणार आहे. टेबलाला चिकटून बसलेल्या नवीन ठिकाणी जावे लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात सुधारणा होणार आहे. इतर बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागाची माहिती होणार आहे. कित्येक वर्षानंतर मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम यांनी ही संधी मिळवून दिल्याची भावना अशा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ